इतिहास सांगतोय,वर्तमानातील वर्तनाचा अन्वय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते.
इतिहास सांगतोय,वर्तमानातील वर्तनाचा अन्वय
Twitter
Published on

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

भाजप आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी आता कितीही प्रयत्न केला तरी हे शक्य नाही. त्यांनीच त्यांचा इतिहास आठवला तरी याचे कारण त्यांच्या सहज लक्षात येईल. जिथे जाऊ तिथे आपली खळगी भरू, ही यांची मानसिकता आहे. बडी मुश्किलसे दुनिया में दोस्त मिलते है... हे ते स्वतःच्या स्वार्थापायी विसरले. म्हणूनच आज त्यांची राजकीय अवस्था ‘जो बुंद से गयी वो हौद से नही आती’ अशी झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. त्यांची विचारसरणी ही हिंदुत्वाचा विस्तार आणि प्रचार करणे ही आहे. त्यासोबतच भारतीय जनता पक्ष ही त्यांची राजकीय शाखा आहे. जिथे सत्तेत नाही किंवा जनमत भाजपच्या बाजूने नाही अशा राज्यात भाजपचा प्रचार करण्याचे कार्य संघ करतो. सत्ता मिळेपर्यंत भाजपदेखील त्यांचा वापर करते. मात्र नंतर इतर बलाढ्य पक्षातील ताकदवार नेत्यांना सोबत घेऊन हळूहळू संघ स्वयंसेवकांना बाजूला सारले जाते. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत असेच भाजपला आता संघाची आवश्यकता नाही, असे विधान करून संघाला त्यांची जागा दाखवून दिली होती. भाजप आणि संघाने याच पद्धतीने अनेक माणसे गमावली आहेत. त्याचाच हा लेखाजोखा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बहुतांश संघटनात्मक कार्य विविध शाखा किंवा शाखांच्या समन्वयातून केले जाते. सार्वजनिक ठिकाणी एक तास या शाखा चालवल्या जातात. २७ सप्टेंबर १९२५ रोजी स्थापन झालेल्या संस्थेची सुरुवातीची प्रेरणा चारित्र्य प्रशिक्षण प्रदान करणे आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी ‘हिंदू शिस्त’ स्थापित करणे हे होते. अगदी सुरुवातीच्या काळात आरएसएसने ब्रिटिश राजवटीला सहकार्य केले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणतीही भूमिका बजावली नाही. संघाचे संस्थापक हेडगेवार हे हिंदू महासभेचे राजकारणी आणि नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते.

सावरकरांचा प्रभाव आणि भेट

१९२३ मध्ये नागपुरात प्रकाशित झालेले वि. दा. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हे पुस्तक वाचून आणि १९२५ मध्ये सावरकरांना रत्नागिरी तुरुंगात भेटल्यानंतर हेडगेवार अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी हिंदू समाजाला बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हेडगेवारांचा असा विश्वास होता की, मूठभर ब्रिटिश भारतासारख्या विशाल देशावर राज्य करू शकले, कारण हिंदू विभागलेले होते. शौर्याचा अभाव आणि पराक्रम करण्याचाही अभाव होता. त्यांनी क्रांतिकारक उत्साही हिंदू तरुणांची संघात भरती केली. त्यांना लाठीसह निमलष्करी तंत्र शिकवले. सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यावर तरुण या संघटनेकडे आकृष्ट झाले. कारण त्यांना असे वाटत होते की, ही इंग्रजांना विरोध करणारी आणि इंग्रजांना देशाबाहेर काढणारी संस्था आहे आणि त्यासाठी हे संघटनेचे कार्य पुढे नेण्यासाठी तरुणांना एकत्रित केले जात आहे. मात्र संघात प्रवेश घेणाऱ्या तरुणांवर संघाच्या प्रचाराची, शाखा वाढवण्याची जबाबदारी सोपवली जाई. त्याचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नसे.

तलवार, भाला आणि खंजीर

संस्थेमध्ये बौद्धिक वैचारिक शिक्षणाची साप्ताहिक सत्रे आयोजित केली जात. त्यात हिंदू राष्ट्र आणि त्याचा इतिहास, इतिहासातील वीर, विशेषत: योद्धा राजा शिवाजी यांच्याविषयी साधे प्रश्न असत. शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज नवीन संघटनेचे प्रतीक म्हणून वापरला गेला. सणांच्या वेळी हिंदू यात्रेकरूंचे रक्षण करणे आणि मशिदींजवळ हिंदू मिरवणुकीविरुद्ध मुस्लिम प्रतिकार झाल्यास त्याचा सामना करणे या बाबी त्यांच्या सार्वजनिक कार्यांमध्ये समाविष्ट होत्या. यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यकर्त्यांना तलवार, भाला आणि खंजीर यांचे प्रशिक्षणही देण्यात येत असे. स्वसंरक्षण हाच यामागील मूळ हेतू होता.

शाखांचा विस्तार आणि त्यातून प्रचार

शाखांचे जाळे विकसित करणे हे हेडगेवारांचे संघप्रमुख म्हणून मुख्य लक्ष्य होते. पहिल्या प्रचारकांवर शक्य तितक्या शाखा स्थापन करण्याची जबाबदारी होती. प्रथम नागपुरात, नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेवटी उर्वरित भारतात. पी. बी. दाणी यांना तर बनारस हिंदू विद्यापीठात शाखा स्थापन करण्यासाठी पाठवण्यात आले होते; त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांमध्येही विद्यार्थी लोकसंख्येमध्ये नवीन अनुयायांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. तीन प्रचारक पंजाबला गेले. अप्पाजी जोशी सियालकोटला, मोरेश्वर मुंजे रावळपिंडीच्या डीएव्ही महाविद्यालयात आणि राजा भाऊ पातुरकर लाहोरच्या डीएव्ही महाविद्यालयात. १९४० मध्ये माधवराव मुळ्ये यांची लाहोरमध्ये पंजाबचे प्रांत प्रचारक प्रादेशिक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

टिळकांच्या निधनानंतर गांधीजींना विरोध

१९२० मध्ये टिळकांच्या निधनानंतर नागपुरातील टिळकांच्या इतर अनुयायांप्रमाणे हेडगेवार यांचाही महात्मा गांधींनी स्वीकारलेल्या काही कार्यक्रमांना विरोध होता. खिलाफत मुद्द्यावरची गांधींची भूमिका हेडगेवारांना अमान्य होती. ‘गोरक्षण’ हा मुद्दा काँग्रेसच्या अजेंड्यावर नव्हता. यामुळे हेडगेवार गांधींपासून वेगळे झाले. काँग्रेसच्या स्वयंसेवक संघटनांमध्ये संघटन नसल्यामुळे हेडगेवार व्यथित झाले. त्यानंतर त्यांना देशाच्या परंपरा आणि इतिहासावर आधारित स्वतंत्र संघटना निर्माण करण्याची गरज भासू लागली. १९२२-१९२४ दरम्यान त्यांनी नागपुरात प्रमुख राजकीय व्यक्तींच्या भेटी घेतल्या. सर्व विरोधी हिंदू गटांना एकत्रित आणून राष्ट्रवादी चळवळीत आणण्याची योजना आखली. त्यातूनच पुढे संघाची स्थापना झाली. संघ निर्मितीची ही माहिती पुन्हा सांगण्याचा हेतू एवढाच की ही मानसिकता आजही तशीच आहे. आज भाजपला संघ नकोसा झाला, कारण ते आता पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघमय झाले आहेत.

व्याप्ती आणि राजकारण

काश्मीर ते कन्याकुमारी या भागात सत्ता कशी मिळेल या एकाच ध्येय्याने ते पछाडलेले होते. जिथे संधी मिळेल तिथे ते चंचुप्रवेश करत आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांतच महात्मा गांधींची हत्या झाली. या हत्येचा कट रचल्याच्या संशयाची सूई हिंदू महासभेच्या नेत्यांवर आली. महासभेच्या शामाप्रसाद मुखर्जी यांनी गांधीजींच्या हत्येचा निषेध केला आणि हिंदू महासभेचा त्याग केला. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री देखील झाले. पुढे नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्यामध्ये झालेल्या निर्वासितांबद्दलच्या करारानंतर मुखर्जींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९५१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या सल्लामसलतीने जनसंघाची स्थापना केली आणि ते जनसंघाचे पहिले अध्यक्ष बनले. १९५२ ला जनसंघाच्या तिकिटावरच त्यांनी निवडणूक लढवली आणि दक्षिण कलकत्ता या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले. पुढे त्यांनी ३७० कलमास विरोध केला. काश्मीर राज्यात बेकायदेशीर प्रवेश केल्यामुळे त्यांना अटक झाली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत देखील अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. पुढे दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले. या काळातही जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांमुळे जनता पक्ष अडचणीत आल्याच्या नोंदी सापडतात. त्याकाळात गमतीने दोन गोष्टी पसरवल्या गेल्या होत्या. ‘जहाँ जहाँ संजय गांधी, वहा वहा नसबंदिकी आंधी’ असे म्हटले जायचे. हाच प्रचार तेव्हा काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला, असेही तत्कालीन ज्येष्ठ नेते सांगतात. दुसरे संघाच्या वा जनसंघाच्या कार्यकर्त्यांबाबत, ‘लबाडाचे आवतान जेवल्याशिवाय खरे नाही आणि ज्या लग्नात जेवतील त्याच नवरा बायकोत भांडणे लावून पळतील’, असा गंमतीशीर प्रचार त्या काळात केला गेला. यातून यांची मानसिकता कशी होती ते लक्षात येते. जिथे जाऊ तिथे आपली खळगी भरू आणि उपयोग झाल्यावर तेच मडके उपडे करून वाजवू, अशी यांची मानसिकता असल्याचे म्हटले गेले.

वाजपेयी, अडवाणी यांचा काळ सुखावणारा

जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजींनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात ‘सर्व धर्म समभाव’ आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे म्हटले गेले. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे. मात्र हा आशावाद वाजपेयी-अडवाणी यांच्या काळापुरता राहिला. भाजपने सत्ता हेच एकमेव ध्येय नजरेसमोर ठेवले आणि ज्या ज्या राज्यात ज्या ज्या पक्षाशी युती-आघाडी केली, त्या त्या पक्षाला संपवण्याचे कारस्थान केले. वाजपेयींनी भर लोकसभेत एकदा म्हटले होते, ‘मैं ४० साल से इस सदन का सदस्य हूं, सदस्यों ने मेरा व्यवहार देखा, मेरा आचरण देखा, लेकिन पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा।’ आज भाजप ना वाजपेयींच्या विचारावर मार्गक्रमण करत आहे ना हेगडेवार यांच्या. सत्ता काबीज करणे हाच यांचा एकमेव अजेंडा आहे. सोबत घेतलेल्या माणसांपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर संघांचे कार्यकर्ते असूनही त्यांना अपेक्षित विजय मिळवता आला नाही, याचे कारण हेच असावे.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in