कुंभमेळ्याचा प्रवास: धार्मिक मेळाव्यापासून जागतिक पर्यटनाकडे

यावर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्याबद्दल खूप चर्चा आहे. याचे कारण देशातील नाही परदेशातील असंख्य पर्यटक या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. कुंभमेळ्याकडे हा धार्मिक मेळावा म्हणून पाहिले जात होते. पण तिकडे जाणाऱ्या लोकांची श्रद्धा, लाखो भाविकांची गर्दी, कुंभमेळ्याचा इतिहास, संस्कृती हे सगळं परदेशी पर्यटकांना आकर्षित करत आहे.
कुंभमेळ्याचा प्रवास: धार्मिक मेळाव्यापासून जागतिक पर्यटनाकडे
एक्स @myogiadityanath
Published on

चौफेर

प्राजक्ता पोळ

यावर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्याबद्दल खूप चर्चा आहे. याचे कारण देशातील नाही परदेशातील असंख्य पर्यटक या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. कुंभमेळ्याकडे हा धार्मिक मेळावा म्हणून पाहिले जात होते. पण तिकडे जाणाऱ्या लोकांची श्रद्धा, लाखो भाविकांची गर्दी, कुंभमेळ्याचा इतिहास, संस्कृती हे सगळं परदेशी पर्यटकांना आकर्षित करत आहे.

अलाहबादच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभमेळ्याची सांगता २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शाहीस्नानाने होणार आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्वाधिक भाविकांच्या उपस्थितीने एक नवा जागतिक विक्रम घडवला आहे. त्यामुळे महाकुंभमेळा हा भारतासाठी केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक, पर्यटन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही चर्चेचा विषय ठरत आहे. या मेळाव्यामुळे भारतातील परंपरा आणि श्रद्धा जगभरात पोहोचत असून, त्याचा आर्थिक आणि सामाजिक परिणामही मोठा आहे.

एका वृत्तवाहिनीवर इटलीमध्ये दोन पर्यटकांनी मुलाखत देताना म्हटले, “या कुंभमेळ्यात सहभागी होणे एक सुंदर अनुभव होता. इकडच्या लोकांची श्रद्धा तर पहायला मिळतेच, पण या सोहळ्यात असंख्य रंगांच्या छटा आहेत. इतक्या लोकांमध्ये सहभागी होताना खूप छान वाटले.”

ब्रिटनमधील २५ वर्षीय टॅलुलाह महाकुंभाचा भाग होण्यासाठी प्रयागराजमध्ये आली आहे. ती सांगतेय, “मी इथे १५ दिवसांपेक्षा जास्त राहणार आहे. कारण हा माझा पहिलाच अनुभव आहे. घरी, मुख्यत: हिंदू समुदायांना कुंभाची माहिती आहे, पण मला शंका आहे की, ब्रिटनमधील लोकांना या भव्य मेळाव्याबद्दल माहिती आहे का?

टॅलुलाहसारखे विदेशी पर्यटक कुंभाकडे आकर्षित होतात, कारण त्यांना गंगेत स्नान करण्याची संधी हवी आहे. साधूंनी सांगितलेल्या पौराणिक कथा त्यांना ऐकायच्या आहेत आणि या कार्यक्रमातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला अनुभव त्यांना घ्यायचा आहे. टॅलुलाह पुढे सांगत होती, “मी भारतात दुसऱ्यांदा आले आहे. मला ऋषिकेशमध्ये खूप शांती मिळाली आणि आता महाकुंभात. हा एक जागतिक इव्हेंट असल्याचे वाटते आहे.”

सोशल मीडियाद्वारे, ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज किंवा सहली करणाऱ्या लोकांद्वारे आध्यात्मिक अनुभवासाठी घेण्यासाठी इथे गर्दी होत आहे.

आणखी एक मुलाखत होती ती ५८ वर्षांच्या कॅरेन न्यूमन यांची, ज्यांनी कृष्णाप्रिया हे भारतीय नाव स्वीकारले आहे, त्या परमार्थ निकेतनमध्ये सेवार्थ आहे. यूएसएमधून आलेल्या कॅरेन न्यूमन महाकुंभ मेळाव्यात आठ दिवस राहणार आहेत. त्या मुलाखतीत सांगत होत्या, “मी १९९०च्या दशकापासून कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहत आहे. काही वर्षांपूर्वी मी एका पुस्तकाच्या दुकानात कुंभमेळ्याचा फोटो पाहिला. मला भारताबद्दल फारसे माहिती नव्हते, पण गंगेच्या पाण्यात उभ्या असलेल्या साधूंचा फोटो आणि त्यामध्ये हजारो लोकांचे दर्शन मी पाहिले. त्यावर लिहिले होते, ‘आई गंगेच्या पाण्यात स्नान करा.’ त्या क्षणी, मी स्वतःला म्हटले, ‘एक दिवस मी तिथे जाईन’ आणि आता, ३० वर्षांनंतर ते स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.

जगभरातील विविध धार्मिक उत्सवांमध्ये महाकुंभमेळा हा पहिल्या क्रमांकावर असल्याचा विक्रम झाला आहे. इराकमधील अर्कबिन उत्सव दुसऱ्या स्थानी, तर फिलिपिन्समधील पोप फ्रान्सिस यांच्या सामूहिक प्रार्थना तिसऱ्या स्थानी आहे. सौदी अरेबियातील हज यात्रा चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, भारतातीलच गंगासागर येथे होणारा मकरसंक्रांतीचा उत्सव पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच, फिलिपिन्समधील ब्लॅक नाझरिन उत्सव, व्हॅटिकन सिटीतील वार्षिक प्रार्थना (मास) महोत्सव आणि जागतिक युवा दिन हेही अत्यंत लोकप्रिय आणि मोठ्या गर्दीचे जागतिक स्तरावरील धार्मिक उत्सव आहेत.

रशिया आणि युक्रेनचे राजदूतांसह ७३ देशांचे प्रतिनिधी यावेळी महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पहिल्यांदाच प्रयागराज येत आहेत. त्यात जपान, अमेरिका, रशिया, युक्रेन, जर्मनी, नेदरलँड्स, कॅमेरून, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीडन, पोलंड आणि बोलिव्हिया यासह इतर देशांतील राजनयिक महाकुंभमध्ये सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास १५ लाख परदेशी पर्यटक या कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. हा मेळाव्याला जागतिक पातळीवर धार्मिक पर्यटनाच्या स्वरूपात प्रसिद्धी देण्यात आली. विशेष म्हणजे या मेळाव्यातून उत्तर प्रदेशच्या आर्थिक गणिताचा आराखडा त्यादृष्टीने तयार करण्यात आला आहे. महाकुंभ २०२५ हे उत्तर प्रदेशाच्या जीडीपीवर महत्त्वपूर्ण परिणाम करणारे आर्थिक उत्पन्न सुमारे दोन लाख कोटी रुपयांपर्यंत निर्माण करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीडीपीमध्ये एका टक्क्यापेक्षा जास्त वाढ होईल. यात असलेल्या कार्यक्रमामुळे विविध क्षेत्रांमध्ये व्यापारास चालना मिळेल, जसे की दैनंदिन आवश्यक वस्तू (१७,३१० कोटी रुपये), हॉटेल्स आणि प्रवास (२,८०० कोटी रुपये), धार्मिक साहित्य (२,००० कोटी रुपये) आणि फुलांचा व्यापार (८०० कोटी रुपये).

प्रयागराजमधील पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून जगभरातील भक्तांचा मोठा ओघ समायोजित करता येईल. मुख्य विकासांमध्ये १४ नवीन फ्लायओव्हर, नऊ कायमचे घाट, सात नवीन बस स्थानके आणि १२ किलोमीटरच्या तात्पुरत्या घाटांचा समावेश आहे. सुरक्षा उपाय कडक असून, ३७,००० पोलीस कर्मचारी, १४,००० होमगार्ड्स आणि २,७५० एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे १३ अखाड्यांचा सहभाग आहे, ज्यामध्ये किन्नर, दशनाम संन्यासिनी आणि महिला आखाड्यांचा समावेश आहे. याचा समावेश लिंग समतेचा प्रतीक आहे आणि धार्मिक प्रथांमध्ये प्रगत दृष्टिकोन दर्शवतो. जात, धर्म, आणि सांस्कृतिक विविधतेत एकता वाढवते. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी महाकुंभ मेळावा २०२५ हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ज्यामुळे भारताच्या पर्यटनाचा विकास अधिक वाढेल ज्याचा आर्थिक फायदा होईल.

prajakta.p.pol@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in