अंतर्गत नाराजीवर शहा तोडगा काढू शकतील का?

महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे आणि निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केवळ...
अंतर्गत नाराजीवर शहा तोडगा काढू शकतील का?
Published on

काऊंटर पॉइंट

- रोहित चंदावरकर

महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे आणि निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी; नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुद्धा महाराष्ट्रात वाऱ्या वाढलेल्या दिसत आहेत. अमित शहा यांचा गेल्या दोन दिवसांत झालेला महाराष्ट्र दौरा हा राजकीय क्षेत्रात मोठ्या चर्चेचा विषय झाला आहे. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नेमके काय काय झाले हे बघणे रोचक ठरेल.

या आठवड्यात महाराष्ट्रात दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी दोन दिवस महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. विदर्भातील काही मतदारसंघ, मराठवाड्यातील सगळे मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघ येथील भाजप नेत्यांच्या बैठका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची रणनीती कशा प्रकारची असेल यावर चर्चा झाली.

विदर्भ हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. विधानसभेच्या ६० पेक्षा जास्त जागा असलेल्या या विदर्भ भागात भारतीय जनता पक्षाची कायम सरशी झालेली आहे. सध्या भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे अनेक वजनदार नेते हे विदर्भातीलच आहेत. असे असले तरीही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष विदर्भात म्हणावे तसे यश मिळवू शकला नाही. शेतकऱ्यांमधील नाराजी आणि महागाई, बेकारीसारखे मुद्दे हे यामागचे कारण असू शकेल. पण भाजपमध्ये पक्षांतर्गत वाढलेली नाराजी आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ हाही त्यामागचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचे प्रमाण वाढणे आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात प्रचाराचे काम चांगल्या पद्धतीने न करणे अशी समस्या पक्षाच्या नेत्यांना जाणवू लागली आहे. अलीकडच्याच काळात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ज्या प्रकारे आपली नाराजी माध्यमांसमोरच उघड केली ते केवळ एक हिमनगाचे टोक होते अशी चर्चा भारतीय जनता पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सरकारमध्ये घेणे, त्यांचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देणे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शिरजोरी करणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत.

या परिस्थितीमध्ये अमित शहा यांचा भर हा भाजप नेत्यांच्या मनात असलेली नाराजी दूर करणे अशा प्रकारचा होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो या पक्षातील काही जणांना आपल्याबरोबर घ्यावेच लागेल आणि आपण केवळ कमळ नव्हे तर धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांना सुद्धा आपलेच चिन्ह मानले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुकीची व्यूहरचना केली पाहिजे, याकडे त्यांचा कल होता. याचा अर्थ असा की राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी विशेषतः इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या बाजूला घेणे आणि त्यांना पदे देणे याबद्दल असलेली नाराजी वाढत असल्याची जाणीव अमित शहा यांना आहे.

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील बैठकांमध्ये झालेल्या चर्चांबद्दल प्रश्न विचारला असता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने एका अर्थाने मान्य केले आहे की त्यांना स्वबळावर कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही आणि त्यांना इतर पक्षातील माणसे घेऊनच निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा आहे. हे एकप्रकारे पराभव मान्य करण्यासारखे आहे. पुण्यामधील कसबा पेठ मतदारसंघांमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाराजीची भावना आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये बाहेरच न पडणे हे होते. लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक मतदारसंघांमध्ये नव्याने घेतलेल्या मित्रपक्षांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असल्यामुळेच भाजपच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला अशी भावना पक्षातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षासमोरचे मुख्य आव्हान अंतर्गत नाराजी कशी कमी कशी करायची किंवा पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते यांना निवडणुकीच्या कामासाठी कसे मोटिवेट करायचे हे आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, अमित शहा यांनी घेतलेल्या बैठका आणि त्यांनी नेत्यांसमोर सांगितलेल्या गोष्टी यामुळे पक्षातील नाराजी कमी होण्यास मदत होईल का? आपल्याला बाहेरचे उमेदवार घ्यावे लागतील किंवा मित्रपक्षांसाठीही तुम्हाला काम करावे लागेल असे थेट अमित शहा यांनी सांगणे हे जरी नेत्यांनी बंद दाराआड झालेल्या बैठकांमध्ये मान्य केले असले तरी ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात आणि बूथ लेवलला अंमलात आणण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे का? महाराष्ट्रातील २५ महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका २०२२ मध्ये व्हायला हव्या होत्या. त्या अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पातळीवरचे नगरसेवक किंवा नगरपरिषदेचे सदस्य वगैरे कोणत्याही पदाविना गेली दोन वर्षे काम करत आहेत. भाजपच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असण्याचे हेही एक मोठे कारण आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आले आहेत. बाहेरच्या पक्षांबरोबर काम करण्याची तयारी ठेवा, हा एक मुद्दा. तसेच पक्षात स्वतःहून काही मागणाऱ्यांना काही मिळत नाही, पण शांतपणे जे काम करतात त्यांना मात्र नक्की पुढे काहीतरी मिळते, असे सांगणे हा दुसरा मुद्दा. म्हणजे तुम्ही नाराजीची भावना ठेवू नका, कुठलीही गोष्ट स्वतःहून मागू नका, शांतपणे काम करत राहा, असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. एक प्रकारे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गप्प राहून काम करावे. इतर मित्रपक्षातील नेत्यांशी जुळवून घ्यावे, असाच संदेश शहा यांनी दिला आहे. आता तो संदेश ग्राऊंड लेव्हलवरचे कार्यकर्ते तंतोतंत पाळतात का, हे पाहणे रोचक ठरेल.

rohitc787@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in