सोडलेल्या नेत्याला लाखोली का वाहतात?

महाराष्ट्राचा राजकीय डीएनए ज्या सामाजिक व सांस्कृतिक अभिरुचीवर आधारला होता ती संपली आहे. जो पक्ष, नेता सोडला त्याला लाखोली वाहण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. आपण कसेही वागलो तरी लोक तरी काय करणार, असाच अविर्भाव दिसतो आहे.
सोडलेल्या नेत्याला लाखोली का वाहतात?
सोडलेल्या नेत्याला लाखोली का वाहतात?
Published on

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

महाराष्ट्राचा राजकीय डीएनए ज्या सामाजिक व सांस्कृतिक अभिरुचीवर आधारला होता ती संपली आहे. जो पक्ष, नेता सोडला त्याला लाखोली वाहण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. आपण कसेही वागलो तरी लोक तरी काय करणार, असाच अविर्भाव दिसतो आहे.

डिसेंबर १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी ऐतिहासिक बंड करत शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठविली तेव्हा अनेकांना ते आवडत नसे. पण काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय कसा अपरिहार्य होता हे पटविण्यासाठी त्यांना ते करावे लागत असणार. तेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा घडले. त्यांनी बाळासाहेबांवर कमी पण उद्धव ठाकरे व त्यांचे जवळचे काही लोक यांच्यावर तुफान टीका केली. राज ठाकरे वेगळे झाले तेव्हा कोणाचे थेट नाव घेतले नाही पण माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे असे सूचक विधान केले.

शिवसेनेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणारे थोड्याफार फरकाने हेच करत आले. पूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणारे इतकी टोकाची टीका करत नसत. अनेकांनी वेगवेगळ्या काँग्रेस काढल्या. पण लोकांना शिसारी येईल, अशी विधाने केली नाहीत. ज्या पक्षात आपण वाढलो आणि मान्यता मिळवली त्या पक्षावर वा तेथील नेत्यावर अर्वाच्च शब्दात टीका टाळली जाई. २००८ मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि अशोक चव्हाण यांना संधी मिळाली. नारायण राणे यांचा मुखभंग झाला. तेव्हा त्यांनी चव्हाण, देशमुख, अहमद पटेल आदींवर सडकून टीका केली ती भाषेचा तोल जरासा सांभाळतच.

हे सारे उगाळण्याचे कारण असे की, अलीकडच्या काही वर्षांत विशेषतः २०२० नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच संस्कृती उदयाला आली. मुद्द्यांचे राजकारण गुद्द्यावर आले. आपापल्या राजकीय भूमिका जनहिताच्या मुद्द्यांवर आधारीत आहेत हे सांगण्यापेक्षा ज्याला सोडून जातोय तो पक्ष वा नेता किती वाईट आहे हे सांगताना पातळी फारच घसरली. राजकारणाची एकूणच विश्वासार्हता कमालीची घसरतेय आणि जनमत फारच वाईट होतेय याची पर्वा कोणी करत नाही.

महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांना घेरण्यासाठी शेलक्या शब्दांचा वापर करत टोकाची भाषा वापरणाऱ्यांना पुढे चाल मिळत गेली. एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले तेव्हा ठाकरे कसे घरी बसून काम करत होते, भेटत नव्हते आणि फेसबुकवरून भाषणे देत होते, असे सांगत टिकेची राळ उठविली. बाळासाहेबांचा वारसा न जपता त्यांनी हिंदुत्वाला कशी तिलांजली दिली यावर भर दिला.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा आपला जुना पक्ष कसा दिशाहीन झाला आहे असे सांगत नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडला तेव्हा आपले काका भाजपासोबत जाण्याचा निर्णय कसे घेत नाहीत आणि आम्हाला पुढे येऊ देत नाहीत, असे बोलत अनेक प्रश्न उपस्थित केले.

याच दरम्यान, भाजपात सामील झालेल्या नारायण राणे व त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याची एकही संधी सोडलेली दिसली नाही. यादी खूप मोठी आहे. राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम पुढे मिलिंद देवरा यांनीही आपापल्या पूर्वीच्या पक्षसंघटनेवर असेच टीकेचे प्रहार केले. आता तर विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या अत्यंविधीला विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पण अपवाद एका पक्षाचा होता असे म्हणत काँग्रेसला डिवचले. त्यावर काँग्रेसकडून कडवट भाषेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला.

या साऱ्या गोष्टीतून ठळक काय दिसते? तर रोज राजकीय विरोधकांवर दुगाण्या झाडणे हा एककलमी कार्यक्रम बनला आहे. पूर्वी राजकीय नेते विविध कळीच्या विषयांवर काय बोलतात याकडे लोकांचे लक्ष असे. शेती, सिंचन, सहकार, उद्योग, गुंतवणूक, प्रादेशिक विकास यावर त्यांची मते लोक ऐकत. आता मारा कशाचा आहे, तर शेलकी विशेषणे, हिणकस भाषा, हेटाळणी, दुस्वास आणि कमालीचा विखार. पूर्वी लोक नेत्यांकडून डंकेल प्रस्ताव, गॅट करार, आंतरराष्ट्रीय व्यापार खुला होण्याने भारतीय बाजारपेठेवर होणारे परिणाम, शेतीचे भवितव्य आदी विषयावर नेत्यांच्या भूमिका जाणून घेत. पण आता किती अभ्यासपूर्ण भाषणे, चर्चा होतात आणि लोकांना काय मिळते हे विचार करण्यापलीकडे गेले आहे.

हे एकाबाजूला ठेवले तर आपली राजकीय वाढ, विकास ज्या पक्षात झाला. ज्या पक्षाने मोठी पदे दिली, रंकाचा राव होण्याची संधी दिली, नवी ओळख तयार झाली, युती वा आघाडीत राहून राजकीय लाभ झाला, त्याबद्दल किती वाईट बोलावे आणि बोललो तर लोकांना काय वाटेल याचा विचार संपलेला दिसत आहे. प्रचंड वेगाने खालावत चाललेला राजकारणाचा दर्जा ही एक चिंताजनक समस्या बनली आहे.

आपणही पक्षाला खूप काही दिले असे म्हणणारेही आहेत. मग ते देण्याची क्षमता तरी कोणी निर्माण केली किंवा समोरच्या पक्षाने उताविळ होऊन स्वागत करावे एवढा आलेख कोणाच्या मदतीने उंचावला, पक्ष बदलला तरी महत्त्व मिळेल, असा बायोडेटा नेमका कशाच्या आधारावर तयार झाला असे विचारले तर काय उत्तर आहे? कोणी कोणाला पाहून ओशाळून जावे हा मोठा प्रश्नच आहे.

शरद पवार यांनी १९७८ नंतर राजकारणात अनेक प्रयोग केले. वेगवेगळे पक्ष, आघाड्या तयार केल्या. पण त्यांना सोडून जाताना किंवा गेल्यानंतर त्यांच्या जुन्हा सहकाऱ्यांनी फार वाईट पद्धतीने त्यांच्यावर हल्ला चढविल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. उलट सोडून गेलेले परत येताना ओशाळलेले दिसले नाहीत. एवढेच काय अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याच्या घालमेलीबाबत केलेली काही विधाने सोडली तर नंतर त्यांच्यासकट त्यांच्या कोणत्याही नेत्याने थोरल्या पवारांना लक्ष्य करणे टाळलेले दिसते.

हेच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत का दिसून आलेले नाही, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ज्यांना त्यांनी मोठी पदे दिली, उमेदवाऱ्या दिल्या, विधानसभा, विधान परिषद, लोकसभेत जाण्याची संधी दिली ते सहजगत्या त्यांचे नेतृत्व झुगारून, टीका करत सोडून गेले. काहींनी तर फारच वाईट पद्धतीने टीका केली. आपण नेमके कसले लोक मोठे केले हा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असणार. तसेच आपणसुद्धा कुठे कुठे चुकत गेलो आणि त्यामुळेच आपल्या पुढेमागे करणाऱ्यांना टिकेची संधी देत गेलो यावरही त्यांनी नक्कीच विचार केला असावा.

काँग्रेसने शिक्षण, सहकार या क्षेत्रात सम्राट तयार केले. कसलाही व्यक्तिगत करिश्मा नसणारे केवळ कुणाचे तरी राजकीय वारस म्हणून मोठे झाले, त्यांनीही अलीकडे पक्षनेतृत्वाला लक्ष्य करत टीका केली. आपण पक्षासाठी खूप केले असे त्यांचे म्हणणे असेल तर जनमानसात आधीच रुजलेल्या पक्षाचे चार जास्त सदस्य निवडून आणणे हे कर्तत्व ठरू शकत नाही. ते आणताना जी साधनसामग्री वापरली तीसुद्धा याच पक्षामुळे मिळाली होती हे कसे दुर्लक्षिता येईल? एकूणच महाराष्ट्राचा राजकीय डीएनए ज्या सामाजिक व सांस्कृतिक अभिरुचीवर आधारला होता ती संपली आहे. आता आपण कसेही वागलो तरी लोक तरी काय करणार आहेत आणि कुठे जाणार आहेत, असाच अविर्भाव दिसतो आहे.

ravikiran100@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in