पार्किंग उठलीय जीवावर

स्वत:चे वाहन असणे हा आता मध्यमवर्गीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र वाहनांची वाढती संख्या अनेक समस्या निर्माण करत आहे. प्रदूषणाच्या समस्येबरोबरच पार्किंगला जागा उपलब्ध नसणे, वाहने कुठेही पार्क केलेली असणे आणि त्यामुळे वाहतूककोंडी होऊन अनेक मानवी तास वाया जाणे या समस्यांबरोबरच स्थानिक गुंडगिरीलाही चालना मिळत आहे.
पार्किंग उठलीय जीवावर
Published on

आपले महानगर

तेजस वाघमारे

स्वत:चे वाहन असणे हा आता मध्यमवर्गीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र वाहनांची वाढती संख्या अनेक समस्या निर्माण करत आहे. प्रदूषणाच्या समस्येबरोबरच पार्किंगला जागा उपलब्ध नसणे, वाहने कुठेही पार्क केलेली असणे आणि त्यामुळे वाहतूककोंडी होऊन अनेक मानवी तास वाया जाणे या समस्यांबरोबरच स्थानिक गुंडगिरीलाही चालना मिळत आहे.

कधीकाळी स्वतःचे वाहन असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. कालौघात मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हाती खेळता पैसा वाढल्याने त्यांनाही श्रीमंती जगणे खुणावू लागले. ही संधी पाहून वाहन कंपन्या, वित्तीय कंपन्यांनी हातपाय पसरले. पगाराचे आकडे जसे फुगू लागले तसे मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसा वाढू लागला. आपले स्वतःचे वाहन असावे या भावनेतून मध्यमवर्गीयांची वाहन खरेदीची गाडी सुसाट धावू लागली. चारचाकी, दुचाकी वाहने वेगाने रस्त्यावर आली. वाढत्या वाहनांमुळे रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी डोळ्यांदेखत पाहण्यावाचून शासकीय यंत्रणेकडे पर्याय उरलेला नाही. पार्किंगच्या नव्या समस्येने मुंबईकरांच्या जीवाला घोर लागला असून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षांत शहरांमधील लोकसंख्या वाढीबरोबर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. झटपट कर्ज उपलब्ध होत असल्याने वाहन खरेदीचे आकडे दरवर्षी नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. परंतु वाहन खरेदी करताना पार्किंगकडे गांभीर्याने न बघितल्याने मुंबईसारख्या शहरात वाहनांची भरमसाट वाढ झाली आहे. कार, दुचाकी वाहने घेण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने अरुंद रस्ते वाहनांच्या गर्दीने भरून गेले आहेत. एकदा वाहन घेतले की, बाजारात एखादी वस्तू आणण्यासाठी जायचे असो किंवा दहा मिनिटांच्या अंतरावर कोणास भेटण्यासाठी जायचे असो, स्वत:ची गाडी हे स्टेटस मानून लोक मोठेपणा मिरवू लागले आहेत. मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी बिनधास्त वाहन पार्किंग करायचे हा विचार डोक्यात फिट असल्याने नाक्यांवर, चौकात, इमारतीजवळ, फुटपाथशेजारी गाडी पार्क करून अरेरावी करण्याची स्पर्धाच वाहनचालकांमध्ये लागली आहे. वाहनचालक आपल्या सोईनुसार गाडी पार्क करत असल्याने त्याचा अनेक वाहनांना अडथळा निर्माण होतो. यातून होणारे वाद आता नित्याचे झाले आहेत.

वाहन पार्किंगची समस्या तीव्र झाल्याने महानगरपालिकांनी विकासकांना पार्किंग उपलब्ध करून देणे सक्तीचे केले आहे. उच्च उत्पन्न गटासाठी प्रत्येक घरासाठी एक पार्किंग बंधनकारक केली आहे. मध्यम उत्पन्न गटातील दोन घरांमागे एक पार्किंग, तर अल्प आणि अत्यल्प गटातील घरांसाठी पार्किंग उपलब्ध करून देणे सक्तीचे नाही. शहरांमध्ये कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींकडेही वाहन असते. मात्र या घटकांसाठी पार्किंग उपलब्ध करून देण्याकडे प्रशासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नाइलाजाने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने यावरून वाद निर्माण होऊ लागले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये गल्लोगल्ली वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने पार्किंगवरून हाणामारीच्या घटना घडत आहेत.

याचा फायदा घेत मुंबईतील काही विभागांमध्ये स्थानिक दबदबा असलेल्या व्यक्ती रात्री गाडी पार्किंग करण्यासाठी तीस ते पन्नास रुपये प्रती वाहन दर आकारत आहेत. पार्किंगची सुविधा वाढण्यात महानगरपालिका अपयशी ठरल्या आहेत. यामुळे पार्किंगवरून होणारे वाद अनेकांच्या जीवावर उठले आहेत. किरकोळ हाणामारी ते जीवघेणे हल्ले वाढीस लागले असून ही बाब चिंताजनक झाली आहे. मुंबई, पुणे शहरांमध्ये पार्किंगवरून होणारे वाद अनेकांच्या जीवावर उठले. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी सामंजस्याने प्रश्न सोडवले पाहिजेत.

शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए प्रकल्प राबविण्यात येत आहेत. परंतु यामध्ये रहिवाशांना पार्किंग उपलब्ध करून देण्याची तरतूद नाही. आजवर राबविण्यात आलेल्या प्रकल्पांमधील रहिवाशी इमारतीच्या गेटपासून जागा दिसेल तिथे वाहने उभी करत आहेत. यामुळे एखादी आगीची घटना घडली तरी अग्निशमन दलाची गाडी इमारतीच्या आसपास पोहचू शकत नाहीत. रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहने पार्किंग होत असल्याने एक वाहन मुश्किलीने पुढे सरकते. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होते.

महानगरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी विविध प्राधिकरणे मेट्रोसारखे प्रकल्प राबवत आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक यंत्रणा बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. शहरांमधील नागरिक सार्वजनिक वाहतुकीऐवजी स्वतःच्या गाडीने प्रवास करत आहेत. परिणामी वाहनांची संख्या वाढण्यासोबतच पार्किंग आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाहतूककोंडी, पार्किंग, वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे प्रश्न जगभरातील देशांना सतावत आहेत. त्यामुळे वाढत्या वाहन खरेदीला लगाम घालण्यासाठी विविध देशांनी पावले उचलली आहेत. जपानने वाहन खरेदीपूर्वी पार्किंग विकत घेणे बंधनकारक केले आहे, तर काही देशांनी विशिष्ट भागात वाहनांचा वापर केल्यास वाढीव शुल्क लावले आहे. यामुळे वाहन खरेदीवर नियंत्रण मिळविण्यात या देशांना काहीसे यश मिळाले आहे. असे निर्बंध राज्यातील सगळ्याच शहरांमध्ये लागू करणे आता गरजेचे बनले आहे.

tejaswaghmare25@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in