सुनेत्रा पवारांची सर्व सूत्रे पार्थ-जय पवारांकडे

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक घडामोडी घडत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदींना बाजूला करीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडील सर्व सूत्रे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार व जय पवार यांनी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
सुनेत्रा पवारांची सर्व सूत्रे पार्थ-जय पवारांकडे
सुनेत्रा पवारांची सर्व सूत्रे पार्थ-जय पवारांकडे
Published on

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक घडामोडी घडत आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदींना बाजूला करीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडील सर्व सूत्रे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार व जय पवार यांनी घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

बारामती पोटनिवडणूक होऊ घातली आहे, जय पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये सभेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन पहिल्याच दिवशी केले होते. राष्ट्रवादी (श.प.)ने त्यास पाठिंबाही जाहीर केला होता. तथापि, आता काँग्रेसने बारामती व राहुरी या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये तणाव वाढत असून संभ्रमावस्था वाढीस लागली आहे आणि या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नवी दिल्लीत गेले दोन दिवस आहेत. यापूर्वी त्यांचे दिल्ली दौरे प्रफुल्ल पटेल आयोजित करीत होते. आता प्रफुल्ल पटेल बाजूला पडले असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. हा मोठा फरक यावेळी दिसून आला. पडद्याआड बऱ्याच हालचाली राष्ट्रवादीत सुरू असून रोहित पवार हे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जाते.

अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीची पुन्हा शकले पडणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खा. प्रफुल्ल पटेल व खा. सुनील तटकरे यांचे पत्ते कट केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर पार्थ पवार व सुनेत्रा पवार यांनी खुलासे केले असले तरी त्याची कुठेही स्पष्टता नाही. एका बाजूला हे होत असताना अजित पवार राष्ट्रवादीत श.प.चे आ. रोहित पवार यांचे वर्चस्व वाढत असल्याने ही संभ्रमावस्था अधिक वाढली आहे.

राष्ट्रवादी या अधिकृत पक्षावर बाहेरच्या नेत्यांचा दबाव वाढत चालल्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षांचा जेव्हा मृत्यू होतो, अपघात होतो तेव्हा निवडणूक आयोग राजकीय पक्षाबाबत निर्णय घेऊ शकतात. हे ठाऊक असल्यानेच सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होताना जी कार्यवाही करावी लागते त्याला वेळ लागतो. म्हणून संबंधित राजकीय पक्षातील नंबर २ व ३ च्या नेत्यांनी पत्र देणे हे संयुक्तिक असते. त्याचा बागुलबुवा निर्माण करून राष्ट्रवादी पक्ष प्रफुल्ल पटेल व तटकरे यांनी हायजॅक केला, असे रोहित पवारांनी म्हटले. सुनेत्रा पवार यांनी पूर्वी दिलेली पत्रे रद्द करण्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले. हे करताना नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक कार्यकारी अध्यक्षांच्या सहीने बोलवावी लागते.

त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांनी ती बोलावली आणि त्यात रीतसर अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे, तर पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवड प्रक्रियेवर एबी फॉर्मवर कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची सही आहे. हे पाहता आता सुनेत्रा व पार्थ पवारांच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. हे सगळे का घडले? या मागचा सूत्रधार कोण? पार्थ पवार या काळात मनसे नेते राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतात, हे पाहता आता सुनेत्रा पवारांची झालेली अध्यक्षपदाची निवडच अडचणीची ठरते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निवडीनंतर एकच काहूर माजले होते. एवढी घाई कशाला. अजितदादांचे श्राद्ध हाेईपर्यंत थांबता येत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामागे शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर जे नाट्य चालले होते त्याला शह देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे इत्यादी नेत्यांनी घाई करून हा शपथविधी करून घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेऊन राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करून टाकली. घटनेच्या नियमाप्रमाणे त्या संस्थेचा अध्यक्ष मयत झाला अथवा त्याला काढून टाकले तर त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवणे आवश्यक आहे व त्याप्रमाणेच आयोगाला कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांची नावे कळवण्यात आली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीमधील हा अंतर्गत पत्रव्यवहार बाहेर फुटला कसा?

अजित पवार यांना जाऊन दोन महिन्यांचा काळ उलटला. विलीनीकरणाची हवा आता विरळ झाली आहे. वास्तविक पाहू गेले तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र आहे व अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष कायदेशीर आहे. असे असताना रोहित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हस्तक्षेप का करतात? यामागचे राजकारण काय आहे?

हे सर्व घडत असताना सुनेत्रा पवार यांनी कुठलेही भाष्य केले नाही. त्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. परंतु ते न मांडता कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या नावावर फुल्ली मारून बाकी कागदपत्रे निवडणूक आयोगाला जोडणे आवश्यक होते का आणि त्यामुळेच संशयाचे जाळे सर्वत्र पसरले आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचे एकूण ४०-४२ आमदार आज आहेत. त्यांच्यामध्येही या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. नक्की काय चालले आहे हे कळत नाही, तर उलट विलीनीकरणाच्या बाजूने ३० ते ३५ आमदार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातो. याचाच अर्थ राष्ट्रवादी खिळखिळी करणे हा अर्थ यातून काढला जातो. बारामतीची पोटनिवडणूक जवळ आली असताना हा बेबनाव घडणे योग्य नाही. सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक स्पष्टता आणणे आवश्यक आहे. अलीकडे ते होत नाही. यावर पार्थ पवार व जय पवार हेच भूमिका मांडत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये १० ते १५ आमदार कडवे आहेत. त्यांना रोहित पवार यांचा हस्तक्षेप सहन होत नाही. मात्र यावर स्पष्टतेची भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेणे आवश्यक आहे. नुकतीच त्यांनी आता विलीनीकरण होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली होती; परंतु अंतर्गत हेवेदावे निर्माण केले जातात. त्याला उत्तर देणे आवश्यक होते.

आश्चर्याची बाब म्हणजे पार्थ पवार हे राज ठाकरेंना जाऊन भेटतात, मात्र आपल्या नेत्यांना भेटत नाहीत याला काय म्हणावे? बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे चार इच्छुक उमेदवारांचे अर्जही आले आहेत. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून शरद पवार गटाची भूमिका काय राहणार, हा प्रश्न आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या निवडीलाही पर्याय नाही. असे असतानाही काँग्रेस निवडणूक लढवून आपला पुन्हा एकदा पराभव करून घेणार यात शंका नाही. बारामतीमध्ये शरद पवार कुटुंबाबाबत एक आगळेवेगळे स्थान आहे. उलट आमचे म्हणणे आहे की, सुनेत्रा पवार यांनी सर्व जबाबदाऱ्या आपल्यावर घेण्यापेक्षा सहकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते; परंतु ते झाले नाही. सर्वच पदे आपल्याकडे ही भूमिका योग्य नाही. हे त्यांनी समजून घ्यायला हवे.

logo
marathi.freepressjournal.in