
मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून गाजावाजा करत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले. या कुंभमेळ्याकडून भक्तांच्या आणि साधू-संतांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र नियोजनात अनेक त्रुटी होत्या. त्यात ऐन कुंभमेळ्यात संगम नाक येथील पवित्र स्नानाच्या वेळी तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भक्तांना प्राण गमवावे लागले, ६० जण जखमी झाले आणि कुंभमेळ्याच्या आयोजकांचे नाक कापले. त्यापाठोपाठ प्रयागराज येथील तंबूमध्ये लागलेली आग आणि नियोजन दारिद्र्यामुळे संतप्त झालेली साधुमंडळी यामुळे कुंभमेळ्याला यंदा गालबोट लागले आहे, असेच म्हणावे लागेल.
कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही; तर तो हिंदू समुदायाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे. यात पवित्र नद्यांमध्ये धार्मिक स्नान करणे, धार्मिक चर्चा करणे आणि आध्यात्मिक प्रवचने या सगळ्याचा समावेश आहे. म्हणूनच या मेळ्याचे नियोजनबद्ध आयोजन होणे गरजेचे असते. महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वपूर्ण असे धार्मिक संमेलन आहे. दर १२ वर्षांनी भारतातील चारपैकी एका ठिकाणी ते होते. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलांसह १० हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. ३ फेब्रुवारीच्या वसंत पंचमीचे तिसरे शाही स्नान शाही पद्धतीत पार पडले आहे. पुढील महत्त्वाच्या ‘स्नान’ तारखा १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) या आहेत. किमान आता तरी काही गोंधळ होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा शाप ढोंगी आहात, पाप केलंय; राजीनामा द्या
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती संतापले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री ढोंगी आहेत. त्यांनी पाप केले आहे. एवढी मोठी घटना घडली अन् ते आमच्याशी खोटे बोलले की, काहीही झाले नाही. आम्हाला त्या मृतांसाठी प्रार्थना करण्याची संधीही दिली गेली नाही. योगी लोकांचा झालेला मृत्यू लपवत आहेत. या महाकुंभात त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेने सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश झाला आहे, असेही ते म्हणाले. महाकुंभात ४० कोटी भाविक, तर मौनी अमावास्येला दहा कोटी भाविक आल्याचा दावा अधिकारी आधीच करत होते. त्यानुसार त्यांनी व्यापक तयारी करायला हवी होती. हे सध्याच्या सरकारचे मोठे अपयश आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. या घटनेने सनातनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, असे आरोप करत त्यांनी भाजप आणि योगींना शाप दिला आहे.
काय आहे संगम नाक?
कुंभमेळ्यादरम्यान ‘संगम नाक’ या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख केला गेला. ‘संगम नाक’ हे पवित्र संगम स्थान आहे जेथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांचा संगम होतो, असे मानले जाते. येथे, गंगेचे पाणी किंचित गढूळ दिसते, तर यमुनेचे पाणी निळसर रंगाचे आहे. त्यामुळे दोन्ही नद्या विलीन होताना स्पष्टपणे दिसतात. या टप्प्यावर यमुना अखेरीस गंगेत विरघळते आणि एकत्रित प्रवाह बंगालच्या उपसागराकडे चालू राहतो. संगमाच्या अगदी समोर असलेला तिकोना घाट ‘संगम नाक’ म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक धुपामुळे घाटाचा आकार बदलत राहतो. ज्यामुळे ‘संगम नाक’ हा उताराचा किनारा बनतो. कुंभ आणि महाकुंभ यांसारख्या भव्य धार्मिक मेळाव्यादरम्यान, हा परिसर केवळ शाही आखाड्यातील संतांसाठी त्यांच्या अमृत/शाही स्नानासाठी राखीव असतो. या भागात सामान्य भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. येथे संत धार्मिक विधी करतात आणि अमृतस्नान करतात, तर सामान्य यात्रेकरू इतर घाटांवर स्नान करतात किंवा बोटीतून मुख्य संगमावर पोहोचतात. केवळ महाकुंभ दरम्यानच नाही, तर प्रयागराजच्या वार्षिक माघ मेळ्यादरम्यानही ‘संगम नाक’ पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, एकादशी, मौनी अमावास्या, वसंत पंचमी, अचला सप्तमी, माघी पौर्णिमा आणि महापौर्णिमा यासारख्या शुभ प्रसंगी संतांच्या विशेष मंडळांचे आयोजन करते. इतर दिवशी, सामान्य भाविकांना या आध्यात्मिकरीत्या भरलेल्या संगमावर पवित्र स्नान करण्याची परवानगी आहे.
सिलिंडर स्फोट-भीषण आग-ढिसाळ नियोजन
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात मध्यंतरी भीषण आग लागल्याचे पाहायला मिळाले. सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. महाकुंभ परिसरातील सेक्टर १९ च्या भागामध्ये दोन सिलिंडरचा स्फोट झाला. महाकुंभ २०२५ मध्ये आतापर्यंत २५ कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या सातव्या दिवशी या परिसरात भीषण आग लागली. पंतप्रधान मोदी ८ किंवा ९ फेब्रुवारीला प्रयागराज कुंभमेळ्याला भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संगमात स्नानही करणार आहेत. सीएम योगी यांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. दुसऱ्या अमृत स्नानापूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी हेलिकॉप्टरने प्रयागराजचा आढावा घेतला आणि संतांची भेट घेतली आहे. त्यांनी योगींकडे आयोजनातील त्रुटींबाबत तक्रार केल्याचेही एकीवात आहे.
महाकुंभ : एक अद्भुत पर्व
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा १३ जानेवारीपासून सुरू झालेला आहे. लाखोंच्या संख्येने साधू, संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत. कडाक्याची थंडी, दाट धुके तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत. दर १२ वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा या विधीबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे, जो भारतातील लाखो हिंदू साजरा करतात. त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच त्यामागील पौराणिक कथांबद्दल किती भक्तांना माहिती असेल हा संशोधनाचा विषय आहे. जी माहिती ज्ञात आहे ती अशी आहे की, कुंभमेळ्याची उत्पत्ती ‘तीर्थ’ (पवित्र पाणी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीभोवतीच्या प्राचीन विधींपासून होते, जिथे यात्रेकरू पापांपासून शुद्ध होण्यासाठी स्नान करतात. कुंभमेळ्याचा उल्लेख वेगवेगळ्या पुराणांमध्ये केला गेला आहे. काळाच्या ओघात कुंभमेळ्याचा एक मोठा उत्सव झाला. हिंदू पौराणिक कथेनुसार, कुंभमेळा हा समुद्रमंथनाच्या कथेशी जोडलेला आहे. देव आणि असुरांनी अमरत्वाचे अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले. यावेळी अमृताने भरलेला एक कुंभ बाहेर आला. असुरांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी, देव तो कुंभ घेऊन पळून गेले. देव धावत असताना कुंभातील अमृताचे थेंब विशिष्ट ठिकाणी पडले. हरिद्वार, प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद), उज्जैन आणि नाशिक ही ती पवित्र स्थाने आहेत. हरिद्वार येथे थेंब ब्रह्मकुंडमध्ये पडले. उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर अमृत पडले. नाशिकला गोदावरी नदीच्या काठावर हे थेंब पडले, तर प्रयागराजला गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम जिथे होतो तिथे हे थेंब पडले. त्यालाच ‘तिकोना घाट का संगम नाक’ असे म्हणतात. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. ज्योतिषीय स्थितीनुसार विशिष्ट वेळा मोजल्या जातात. कुंभमेळ्याचे एक लघु रूप ज्याला अर्धकुंभमेळा म्हणतात, तो दर सहा वर्षांनी अलाहाबाद आणि हरिद्वार येथे भरतो.
सर्व आखाडे आणि पंथ यांचा मेळा
कुंभमेळ्यात साधूंचे विविध आखाडे आणि पंथ उपस्थित असतात. प्रत्येकजण उत्सवात महत्त्वाची भूमिका बजावतो. आखाडे हे एका विशिष्ट आध्यात्मिक परंपरेचे पालन करणारे मठवासी वर्ग किंवा साधूंचे गट आहेत. सुमारे १३ मुख्य आखाडे आहे. निर्मल संन्यासी (निर्मल आखाडा), जुना आखाडा, निरंजनीचा अखाडा, महानिर्वाणी आखाडा, श्री पंचायती आखाडा, श्री उदासिन आखाडा, ब्रह्मगिरी आखाडा, श्री दत्तात्रेय आखाडा हे प्रमुख आखाडे महाकुंभमध्ये सहभागी होतातच. प्रत्येक आखाड्याचे स्वतःचे आध्यात्मिक नेते (सद्गुरू) आणि अनुयायी असतात आणि ते भक्तांना आध्यात्मिक पद्धतींवर मार्गदर्शन करतात. हे आखाडे हिंदू धर्मातील विविध सांस्कृतिक आणि तात्त्विक परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. भक्ती चळवळीतील पंथांसारख्या प्रमुख पंथांनाही कुंभमेळ्यात प्रतिनिधित्व मिळू शकते. कुंभमेळ्यादरम्यान आखाडे आणि पंथ विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात. स्नानविधीच्या कार्यक्रमात पंथाचे प्रमुख स्वतःला आणि त्यांच्या अनुयायांना शुद्ध करण्यासाठी विधी स्नानाचे नेतृत्व करतात आणि त्यात सहभागी होतात. तसेच भक्तांना प्रबोधित करण्यासाठी आध्यात्मिक ग्रंथ आणि तत्त्वज्ञानावर चर्चा आयोजित केल्या जातात. भव्य मिरवणुकांमध्येही साधू मंडळी सहभागी होतात. अनेक आखाडे यात्रेकरूंना मोफत जेवण (लंगर), वैद्यकीय सहाय्य आणि इतर प्रकारची मदत देतात.
साधू नाराज, व्यवस्था कमजोर
यंदाच्या महाकुंभ दरम्यान साधूंमध्ये विविध कारणांमुळे असमाधान आहे. काही साधूंना वाटते की, हा उत्सव आता नफा-केंद्रित झाला आहे. यासाठी या प्रश्नांचे निराकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यात होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यामध्ये या गोष्टी टाळून साधूंची नाराजी टाळायला हवी.
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.