पवारांमधील संघर्ष शिगेला

बारामती लोकसभा मतदारसंघातील खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार व त्यांचेच पुतणे अजितदादा यांच्यातील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचला आहे.
पवारांमधील संघर्ष शिगेला

- राजा माने

राजपाट

बारामती लोकसभा मतदारसंघातील खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार व त्यांचेच पुतणे अजितदादा यांच्यातील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचला आहे. उभ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि सर्वपक्षीय राजकीय मंडळी या संघर्षाकडे आपापल्या चष्म्यातून बघत आहेत. अजित पवारांनी आपण विभक्त का झालो, त्या कारणांची जंत्रीच जाहीरपणे लोकांपुढे मांडली. पण शरदराव पवार यांनी अजित पवारांना जाब विचारणारी किंवा ‘अजित, हे चुकतंय!’ असे सांगणारी थेट भूमिका मांडल्याचे दिसत नाही.

महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील वैभवशाली वाटचालीत सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यापैकी अनेकजण वादांच्या भोवऱ्यातही सापडले, पण त्यांचे योगदान आणि मोठेपण महाराष्ट्राने कधीही नाकारले नाही. तशाच प्रकारच्या संघर्षातून जुन्या पिढीतील शरद पवार आणि नव्या पिढीतील अजितदादांमधील राजकीय संघर्ष सध्या गाजत आहे.

स्वातंत्र्यानंतर नेहरू-गांधी घराणे आणि काँग्रेसच्या साम्राज्याला १९७०च्या दशकात पहिला धक्का मिळाला. देशातील त्या राजकीय परिवर्तनाचे नायक जयप्रकाश नारायण हे होते. तेव्हापासूनच देशातील सर्वच राज्यातील राजकीय चेहरा आणि संस्कृती बदलाची प्रक्रिया गतिमान झाली. प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांमध्येही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असणारे स्वयंभू नेते राज्या-राज्यात तयार झाले. त्याच परंपरेतून महाराष्ट्रात शरद पवार हा नेता दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा ‘मानसपुत्र’ म्हणून उदयास आला. तेव्हापासूनच बदलते जग आणि काळाच्या मागणीस अनुकूल असेच राजकारण देशात आणि राज्यात शरद पवार करीत राहिले. यातूनच अनेकदा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेच्या विरोधातील भूमिका पवारांनी घेतल्या. १९७८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसंघासह (आताचा भाजप) अनेक पक्षांना सोबत घेऊन वसंतदादा पाटील यांच्या विरोधात बंड करून वयाच्या ३८व्या वर्षी शरद पवार स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष काढला. काळाच्या मागणीनुसार १९८६ साली दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या साक्षीने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. आपल्या राजकीय कारकीर्दीत ते पाच वेळा मुख्यमंत्री, काही वेळा केंद्रीय मंत्री झाले. पुढे १९९९मध्ये त्यांनी सोनिया गांधींच्या विरोधात बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. एकूणच राजकीय उपद्रवमूल्य व काळाच्या मागणीनुसार भूमिका हे त्यांच्या कारकीर्दीचे वैशिष्ट्य राहिले. १९८० च्या दशकात पवारांचे राजकीय पिता यशवंतराव चव्हाण यांना इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश देण्यास विलंब नाट्य रंगवून जी अवहेलना केली, त्यावेळीही पवार यशवंतरावांसोबत नव्हते.

१९९०मध्ये शरद पवारांनी आपले पुतणे अजित यांना राजकारणात आणले. तिथेच शरद पवार यांच्या ‘अविश्वासार्हता’ या वैशिष्ट्याचे विरुद्ध टोक असलेल्या परखड, रोखठोक आणि स्पष्टवक्ता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचा उदय झाला.

राजकारणाची दिशा ओळखून नेहमीच विकासाचे राजकारण करणारा आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता म्हणूनच अजितदादांकडे पाहिले गेले. कुशल संघटन कौशल्य, दांडगा लोकसंपर्क, पक्षीय पातळीवर मजबूत पकड, कामाची धडाडी आणि गतिशील विकासकामांची हातोटी, रोखठोक भूमिका अशी आणखी काही वैशिष्ट्य मानावी लागतील. त्यामुळे पक्षात दादा फॅक्टर वाढत असताना कसोटीच्या काळात सातत्याने त्यांना पुढे करून प्याद्याप्रमाणे वापर करायचा आणि एखादी गोष्ट अंगाशी येतेय, असे वाटताच वेगळी भूमिका घेऊन आपल्याच नेत्याला तोंडघशी पाडायचे व त्याची राजकीय कोंडी करायची, अशा अनेक घटनांची मालिका शरद पवारांनी नेहमीच गुंफली. या उलटसुलट खेळ्यांना कंटाळून दूरदृष्टी ठेवून राज्याच्या विकासासाठी वेगळी भूमिका त्यांनी घेतली तर बिघडले कुठे?

खरं तर देशाला आणि महाराष्ट्राला असे संघर्ष नवे नाहीत. राज्याचे भले पाहणाऱ्या दिग्गज नेत्यांमधील असा संघर्ष पूर्वीही राज्याने पाहिलेला आहेच. फक्त कालचक्राने त्या संघर्षातील राजकीय भाषा, तंत्र आणि डावपेचांची शैली बदलली आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे ‘मानसपुत्र’ शरद पवारांनी एका जमान्यात जो अनुभव आपल्या ‘मानसपित्या’ला दिला, तोच अनुभव आज पवारांना त्यांचे पुतणे देत आहेत. आरोपांबाबत बोलायचे झाले तर खुद्द शरद पवारांवरच ‘दाऊदशी संबंध’ आणि ‘ट्रकभर भ्रष्टाचाराचे पुरावे’ असे आरोप झाले होते. अगदी बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंपासून आज विकासपुरुष आणि स्पष्टवक्ते म्हणून देशात लोकप्रिय असलेले नितीन गडकरी यांच्यावरही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना काँग्रेस राजवटीत गंभीर आरोप झाले होतेच ना. म्हणूनच अजितदादांचे काय चुकले? हे शरदरावांनी सांगावे.

खरे तर शरद पवारांच्या घराण्याची नाळ ही शेतकरी कामगार पक्षाशी जोडलेली होती. तरीही १९६०च्या दशकात काळाच्या मागणीनुसार काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार मुख्य प्रवाहात सामील झाले. तशाच प्रकारच्या काळाच्या मागणीनुसार सोयीच्या असलेल्या भूमिका ते आजवर घेत राहिले. मग अजितदादांची आजची भूमिका चूक की बरोबर? राज्याच्या विकासाची पुढील अनेक वर्षांची दिशा आणि दृष्टिकोन व पुरोगामी विचारांची बैठक घेऊन अजितदादा देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात सक्रिय झाले आहेत, असे ते सांगत आहेत. शरद पवार मात्र थेट आणि ठोस काही न बोलता वरवरचे बोलतात.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in