

भारतीय संगीतविश्वावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आपल्या अद्वितीय आवाजासोबतच त्यांनी जपलेली पारंपरिक आणि एलिगंट स्टाइलही तितकीच लक्षवेधी होती. बदलत्या काळातही त्यांनी आपली ओळख कधीच बदलली नाही आणि म्हणूनच त्या फक्त गायिका नाहीत, तर स्टाइल आयकॉनही ठरल्या. बदलत्या फॅशन ट्रेंड्सच्या गर्दीतही त्यांनी कायम पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक जपला आणि त्यालाच आपली ताकद बनवली.
परंपरेतून उमटलेली एलिगन्स
आजूबाजूला फॅशन सतत बदलत असताना, आशाताई मात्र परंपरेशी घट्ट जोडलेल्या राहिल्या. पुरस्कार सोहळा असो, फॅशन शो असो किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, त्यांची स्टाइल कधीच बदलली नाही. साडी, दागिने आणि केसांत माळलेली फुलं हीच त्यांची खरी ओळख ठरली.
साडी, टिकली आणि फुलं
आशा भोसले यांच्या स्टाइलमध्ये काही गोष्टी कायम असायच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या, कपाळावर मोठी टिकली आणि कोणतीही हेअर स्टाइल असो त्यात फुलं माळलेली असायचीच. हा त्यांचा सिग्नेचर लूक त्यांनी देश-विदेशातील प्रत्येक मंचावर अभिमानाने सादर केला.
दागिन्यांमध्ये खास टच
मोत्यांच्या माळा, सोने किंवा डायमंड ज्वेलरीसोबत त्यांच्या हातात दिसणारे खास ब्रेसलेटही त्यांच्या स्टाइलचा भाग बनले. या ब्रेसलेटबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली, तरी ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळा ठसा देतं.
परंपरेला कायम महत्त्व
फॅशनमध्ये बदल करणे हा ट्रेंड असताना, आशा भोसले यांनी परंपरेला महत्त्व दिलं. त्यांनी आपली ओळख कधीच बदलली नाही. उलट, त्याच पारंपरिक लूकला प्रत्येक दशकात नव्या आत्मविश्वासाने सादर केलं.
स्टाइलचा प्रवास : १९६० ते आजपर्यंत
१९६० च्या दशकात त्यांनी साडी, केसांचा अंबाडा आणि पारंपरिक दागिन्यांसह आपली इमेज तयार केली. १९९० च्या इंडीपॉपच्या काळातही त्यांनी वेस्टर्न लूक स्वीकारला नाही. 'जानम समजा करो' सारख्या अल्बममध्ये काम करतानाही त्यांनी साडीचाच पर्याय निवडला.
जागतिक मंचावरही परंपरेचा ठसा
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यावरही त्यांनी आपली ओळख बदलली नाही. ग्रॅमीसाठी नामांकन मिळाल्यानंतरही त्यांनी पारंपरिक साडीचाच लूक कायम ठेवत भारताच्या संस्कृतीचा अभिमान जपला.
अखेरपर्यंत कायम राहिली ओळख
शेवटपर्यंत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये साडी, टिकली आणि साधेपणातील सौंदर्य कायम दिसलं. काळ बदलला, वय वाढलं, पण त्यांची स्टाइल आणि ओळख कायम राहिली.