

फ्रान्समधील फ्रेंच रिव्हिएरावर सुरू असलेल्या ७९ व्या कॅन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतीय सेलिब्रिटींचे आगमन सुरू आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीही या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कॅन्समध्ये पोहोचली असून तिच्या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी हुमा कुरेशीने परदेशात भारतीय हस्तकलेचा खास ठसा उमटवला. १६ मे रोजी हुमाने आपल्या नव्या फॅशन लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "बनारसच्या घाटांपासून फ्रेंच रिव्हिएरापर्यंत... काळाच्या प्रवासातून आलेल्या विणकामाची साडी परिधान करण्याचा अनुभव खूप खास आहे. पारंपरिक बनारसी विणकामातील आठवणी आणि आधुनिक डिझाइनचा संगम मला सर्वाधिक आवडतो."
"कान्समध्ये सिनेमा आणि कथांच्या वातावरणात स्वतःची एक वेगळी कथा सांगणारा पोशाख परिधान करणं खूपच खास वाटत आहे," असेही तिने म्हटले.
या खास प्रसंगासाठी हुमाने 'शांती बनारस' ब्रँडची जांभळ्या आणि सोनेरी रंगाची बनारसी साडी आणि ब्लाऊज परिधान केला होता. तिने या लूकसोबत ‘अमरपाली ज्वेल्स’चे दागिने, तसेच भारतीय ब्रँड ‘काव्या पोटलुरी’ची रिंग आणि बॅग कॅरी केली होती.
मेकअपसाठी हुमाने ग्लॉसी लाईट-पिंक लिप्स, ब्रॉन्झ-गोल्ड आयशॅडो, मस्कारा, विंग्ड आयलाइनर, फेदर्ड ब्रोज, हलके ब्लश्ड चीक्स आणि हायलायटरचा वापर केला होता. तिने साइड पार्टिंग करून केस मोकळे ठेवले होते आणि सॉफ्ट वेव्ह्जमध्ये स्टाईल केले होते.
हुमाच्या जांभळ्या बनारसी साडीत सोनेरी ब्रोकेड एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. या साडीवर पाम ट्री मोटिफ्स देण्यात आले होते, ज्यातून फ्रेंच रिव्हिएराचा फील दिसून येत होता. त्याचवेळी भारतीय विणकामाची उत्कृष्ट कारागिरीही या साडीतून झळकत होती.
हुमाने मौल्यवान दगड आणि पोल्की वर्क असलेला गोल्ड नेकलेस घातला होता. यासोबत मॅचिंग इअररिंग्स आणि स्टेटमेंट रिंगने तिचा लूक अधिक आकर्षक बनवला. न्यूड पिंक नेल्स आणि एम्ब्रॉयडरी मिनी क्लच बॅगने संपूर्ण पारंपरिक लूकला परफेक्ट फिनिशिंग टच दिला.
हुमा कुरेशी 'गँग्स ऑफ वासेपूर'सह अनेक हिंदी चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनुराग कश्यप दिग्दर्शित २०१२ मधील या क्राईम ड्रामामुळे तिला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
तिला फिल्मफेअर OTT पुरस्कारासह तीन फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकनही मिळाले होते. याशिवाय तिने 'एक थी डायन', 'डेढ इश्किया', 'बदलापूर', 'हायवे', 'जॉली एलएलबी २', 'काला' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.