

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दांपत्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लग्नानंतर या दोघांनी त्यांच्या मेहंदी आणि 'प्रधानम' (प्री-वेडिंग) समारंभातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले असून ते फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे रश्मिकाच्या मेहेंदीतील धार्मिक चिन्हे आणि कन्नड-तेलुगू संस्कृतीचा संगम पाहून चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
२६ फेब्रुवारीला विवाह, ४ मार्चला भव्य रिसेप्शन
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत विवाह केला. त्यानंतर ४ मार्चला हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
मेहंदी समारंभातील रश्मिकाचा खास लूक
मेहंदी समारंभासाठी रश्मिकाने डिझायनर करण तोरानी यांच्या 'तोरानी इंडिया' लेबलची आकर्षक मल्टिकलर साडी परिधान केली होती.
या साडीच्या पदरावर देवी लक्ष्मीचे सुंदर चित्र काढलेले होते, त्यामुळे तिचा लूक अधिकच उठून दिसत होता.
यासोबतच रश्मिकाच्या हातांवरील मेहेंदी डिझाइन देखील चर्चेचा विषय ठरला. तिने आपल्या हातांवर ॐ, स्वस्तिक आणि त्रिशूळ यांसारख्या नाजूक आकृत्या रेखाटल्या होत्या. हिंदू परंपरेत या चिन्हांना संरक्षण, समृद्धी आणि नव्या आयुष्यासाठी दैवी आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.
इतकंच नव्हे, तर रश्मिकाने 'शिव' आणि 'शक्ती' हे शब्द कन्नड आणि तेलुगू लिपीत मेहेंदीत लिहिले होते. या डिझाइनमधून नवदांपत्याच्या दोन्ही संस्कृतींचा सन्मान आणि परंपरांचा सुंदर संगम दिसून येतो.
विजय देवरकोंडाचा पारंपरिक अंदाज
विजय देवरकोंडा देखील या समारंभात पारंपरिक वेशात दिसले. त्यांनी कुर्ता, धोती आणि भरतकाम असलेली जॅकेट परिधान केली होती. साधा पण एलिगंट लूकमुळे तेही तितकेच आकर्षक दिसत होते.
फोटोंमधील रोमँटिक क्षण
समोर आलेल्या फोटोंमध्ये रश्मिका आणि विजय कुटुंबीय व मित्रांसोबत आनंद साजरा करताना दिसतात. काही फोटोंमध्ये हे दोघे एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
तर एका खास फोटोमध्ये विजय रश्मिकाच्या कपाळावर प्रेमाने किस करताना दिसतात. हा फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असून चाहत्यांना तो विशेष आवडला आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह
हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली. चाहत्यांकडून या जोडप्यावर भरभरून प्रेम व्यक्त केले जात आहे. अनेकांनी कमेंट करत "परफेक्ट कपल", "खूप सुंदर जोडी" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लग्नानंतरही रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची ही झलक चाहत्यांना विशेष भावली असून त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा अजूनही रंगताना दिसत आहे.