राज्यसभेच्या ३६ टक्के उमेदवारांवर गुन्ह्यांचे आरोप; असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल

विश्लेषणामध्ये उमेदवारांच्या आर्थिक पार्श्वभूमीचा शोध घेण्यात आला. राज्यसभेचे साधारण २१ टक्के उमेदवार अब्जाधीश आहेत.
राज्यसभेच्या ३६ टक्के उमेदवारांवर गुन्ह्यांचे आरोप; असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल

नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३६ टक्के उमेदवारांवर गुन्हेगारीचे आरोप असल्याचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिला आहे. तसेच या उमेदवारांची सरासरी मालमत्ता १२७.८१ कोटी रुपये असल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे.

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी ५९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यापैकी ५८ उमेदवारांनी अर्ज भरताना सादर केलेल्या स्व-प्रतिज्ञापत्रांचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी विश्लेषण केले. खराब स्कॅन केलेल्या कागदपत्रांमुळे कर्नाटकातील काँग्रेसचे उमेदवार जी. सी. चंद्रशेखर यांना विश्लेषणातून वगळण्यात आले. विश्लेषणात असे आढळून आले की, ३६ टक्के उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे. यापैकी १७ टक्के व्यक्तींवर गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत आणि एका उमेदवारावर खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटला दाखल आहे.

याशिवाय विश्लेषणामध्ये उमेदवारांच्या आर्थिक पार्श्वभूमीचा शोध घेण्यात आला. राज्यसभेचे साधारण २१ टक्के उमेदवार अब्जाधीश आहेत. त्यांच्याकडे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती १२७.८१ कोटी रुपये आहे. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांची एकूण संपत्ती १,८७२ कोटी रुपये आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या उमेदवार जया अमिताभ बच्चन यांची संपत्ती १,५७८ कोटी रुपये आहे. कर्नाटकातील जेडीएसचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांची एकूण संपत्ती ८१७ कोटी रुपयांची आहे. हे तिघे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. सर्वात गरीब उमेदवारांमध्ये भाजपचे मध्य प्रदेशातील उमेदवार बालयोगी उमेश नाथ (संपत्ती ४७ लाख रुपये), भाजपचे पश्चिम बंगालचे उमेदवार समिक भट्टाचार्य (१ कोटी रुपये) आणि भाजपच्या उत्तर प्रदेशातील उमेदवार संगीता (१ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

राज्यसभेच्या १७ टक्के उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ५वी पास ते १२वी उत्तीर्ण आहे, तर लक्षणीय ७९ टक्के उमेदवार पदवी किंवा उच्च पदवी धारण करतात. बहुसंख्य उमेदवार (७६ टक्के) ५१ ते ७० वर्षे वयोगटातील आहेत आणि १६ टक्के उमेदवार ३१ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. यंदा राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये केवळ १९ टक्के महिला आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पक्षनिहाय उमेदवार

पक्ष राज्यसभेचे गुन्हेगारी उमेदवार पार्श्वभूमीचे उमेदवार

भाजप ३० ०८ (२७ टक्के)

काँग्रेस ०९ ०६ (६७ टक्के)

टीएमसी ०४ ०१ (२५ टक्के)

सपा ०३ ०२ (६७ टक्के)

वायएसआरसीपी ०३ ०१ (३३ टक्के)

आरजेडी ०२ ०१ (५० टक्के)

बीजेडी ०२ ०१ (५० टक्के)

बीआरएस ०१ ०१ (१०० टक्के)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in