राज्यात ५५.५४ टक्के मतदान,तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्के मतदान!

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामतीसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात ५५.५४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यात ५५.५४ टक्के मतदान,तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्के मतदान!

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामतीसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात ५५.५४ टक्के मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बादलवाडी येथे ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाला, तर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात मतदान केंद्राजवळच एकाचा भोसकून खून झाला, तर तिघे जखमी झाले. तसेच काही ठिकाणी हाणामारी, तर एके ठिकाणी बोगस मतदान आणि मतदार यादीत नाव न आल्याने गोंधळ असे काही प्रकार वगळले तर राज्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागलेल्या या ११ मतदारसंघांतील २५८ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला २ कोटी मतदारांनी ईव्हीएममध्ये मंगळवारी बंद केला आहे.

लेकीसाठी शरद पवारांचे बारामतीत मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत अटीतटीची बनली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या आपल्या लेकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी मुंबईमध्ये मतदान न करता बारामतीच्या माळेगावमधून मतदान केले. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी ‘बीसीसीआय’च्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये बदलून घेतले होते. पवार मतदानासाठी केंद्रावर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पवार यांच्यासह त्यांच्या अन्य कुटुंबीयांनीही मतदान केले.

सुप्रिया सुळे यांनी घेतली अजितदादांच्या आईची भेट

सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी थेट काटेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. ‘त्या माझ्या काकी आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले’, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यावर अजित पवार यांनी ‘सुप्रिया सुळे आईला भेटल्याचे माहीत नाही. माझी काही भेट झालेली नाही आणि अशा कुणाच्या भेटीने बारामतीकर मत देत नसतो, तर बारामतीचे मत विकासाला असते’, असे नमूद केले.

मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी (५ वाजेपर्यंत)

लातूर ५५.३८ टक्के

सांगली ५२.५६ टक्के

बारामती ४५.६८ टक्के

हातकणंगले ६२.१८ टक्के

कोल्हापूर ६३.७१ टक्के

माढा ५०.०० टक्के

उस्मानाबाद ५२.७८ टक्के

रायगड ५०.३१ टक्के

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ५३.७५ टक्के

सातारा ५४.११ टक्के

सोलापूर ४९.१७ टक्के

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक, तर बारामतीत कमी मतदान

संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६३.७१ टक्के, तर त्या खालोखाल हातकणंगलेमध्ये ६२.७१ टक्के मतदान झाले आहे. बारामतीत सर्वात कमी मतदान झाले असून पाच वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगल्याने बारामती मतदारसंघाच्या मतदानात वाढ होईल असा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही. आता या कमी झालेल्या मतदानाच्या टक्क्याचा कोणाला लाभ होतो आणि कोणाला तोटा हे येत्या ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.

सांगोल्यात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बादलवाडी येथे ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ईव्हीएम पेटवण्यामागचे कारण काय, हे समजू शकले नाही. ईव्हीएमला आग लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळाले आहे. त्यानंतर या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

भूम तालुक्यात एकाचा खून, ३ जखमी

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे थेट मतदान केंद्राच्या जवळच एकाचा भोसकून खून करण्यात आला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

सर्वाधिक मतदान आसाममध्ये, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान…

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ६१.८९ टक्के मतदान झाले. या टक्केवारीत आणखी वाढ होऊ शकते. आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे.

आसाममध्ये सर्वाधिक ७५.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५५.५४ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६७.६४ टक्के, दादरा नगर हवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.४७ टक्के मतदान झाले. याशिवाय गुजरातमध्ये ५६.९८ टक्के, कर्नाटकमध्ये ६८.८५ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६४.०२ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील मतदारसंघात मतदान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगर येथून, ज्योतिरादित्य शिंदे (गुणा), मनसुख मांडवीय (पोरबंदर), पुरषोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) व एसपी सिंग बघेल (आग्रा) या दिग्गजांचे भवितव्य मंगळवारी मतदानयंत्रात बंद झाले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरुद्ध बारामतीत २०० हून अधिक तक्रारी

मतदारांना पैशांचे वाटप केल्याच्या प्रकारासह निवडणुकीत अनेक गैरप्रकार केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी २०० हून अधिक तक्रारी नोंदविल्या आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर ८० ते ९० तक्रारी पैशांच्या वाटपाबद्दल आणि धमक्या देण्याबाबतच्या आहेत, असेही ते म्हणाले.

हाणामारी, बोगस मतदानाचे प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली. वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवावे लागले. यासोबतच सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची घटना निदर्शनास आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

किरण सामंत ‘नॉट रिचेबल’

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात चुरस आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी हवी होती. परंतु, त्यांच्याऐवजी भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते. त्यातच ऐन मतदानाच्या दिवशी दिवसभर ते ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे राणे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. किरण सामंत यांच्यासह कुटुंबीयांनी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी पाली येथे मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. दरम्यान, आपल्या सिमकार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण ‘नॉट रिचेबल’ होतो, पण आपले ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मतदान होत असलेल्या मतदारसंघात बहुतांशी दुरंगी लढत होत असून अनेक ठिकाणी उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आमने-सामने उभ्या असल्या तरी खरा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यात आहे. त्यामुळे बारामतीची लढत सर्वाधिक चर्चेची ठरली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचे आव्हान आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी कोळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना होत आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली राजकीय पत राखण्यासाठी मुलगी प्रणिती शिंदेला सोलापूरमधून उतरविले आहे. भाजपने शिंदे यांच्या विरोधात आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.

माढामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशी तिरंगी लढत होत आहे. साताऱ्यात भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने येथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू महाराज यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in