मुंबई काँग्रेसला मोठा धक्का! मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला अखेर रामराम

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती.
मुंबई काँग्रेसला मोठा धक्का! मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला अखेर रामराम

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपण काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. देवरा हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. देवरा यांचा राजीनामा हा महाविकास आघाडीसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

मिलिंद देवरांचे द्विट-

"आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी कॉंग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांचे नाते संपवत आहे. सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे", असे देवरा यांनी त्यांच्या 'एक्स'पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिंदे गटात प्रवेश करणार ?

मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती देखील समोर येत आहे. त्याआधी ते सिद्धीविनायक मंदिरात देखील जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

देवरा हे दोन वेळा दक्षिण मुंबई मतदार संघातून काँग्रेकडून खासदार होते. गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. सावंत हे दक्षिण मुंबई मधून विद्यमान खासदार असल्याने आणि ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याने ठाकरे गट या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे देवरा हे नाराज असल्याच्या चर्चा सूरू होत्या.

देवरा हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सूरू असताना त्यांनी त्या फेटाळल्या होत्या. “मी अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत. त्या निराधार आहेत. मला विश्वास आहे की काँग्रेस नेतृत्व पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेचा विचार करेल”, असे देवरा यांनी शनिवारी म्हटले होते. ते त्यांच्या समर्थकांसोबत काही योजना करत आहेत का, असे विचारले असता, "मी माझ्या समर्थकांचे म्हणणे ऐकत आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही", असेही त्यांनी सांगितले होते.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिग्गज नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा जिंकली होती. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता.

गेल्या काही दिवसांपासून देवरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याही संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. यावरून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे अंदाज बांधण्यात येत होते. मात्र,राजकीय चित्र पाहून देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकांकडे देवरा यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.

logo
marathi.freepressjournal.in