शरद पवार यांना धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर राऊतांना धमकी देणारे दोनजण पोलिसांच्या ताब्यात

शरद पवार यांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता, तर राऊत यांना धमकी देणारे नशेच्या धुंदीत
File Photo
File PhotoANI

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत या दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार यांना 'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या गृपवरुन "तुमचा दाभोळकर करु" अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू भांडूप मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांना एका अज्ञाताने कॉल करुन "सकाळी 9 वाजेचा भोंगा बंद करा, नाही दोन्ही भावांना गोळ्या घालू", अशी धमकी दिली. यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांना याबातची माहिती दिली.

या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीवरुन नर्मदा पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणी पुढली तपास करत आहे. तर संजय राऊत आणि सुनील राऊत यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राऊत बंधुंकडून याप्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्यानं या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही जण हे गोवंडीतील राहणारे असून त्यांनी नशेत असताना ही धमकी दिल्याची माहिती आहे.

पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणारा 26 वर्षीय सौरभ पिंपाळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या ट्विटरवर ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम’ असं लिहून ठेवलं आहे. तसंच त्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत फोटो असल्याचं समोर आलं आहे. सौरभ हा अमरावतीमधील साईनगर भागात राहतो. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या असून गाडगेनगर पोलिसांचं एक पथक त्याचा शोध घेत आहे. सौरभच्या घरी देखील हे पथक जाऊन आले आहे. पण सौरभ त्या ठिकाणी आढळून आलेला नाही, त्याचा मोबाईल फोन देखील बंद आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in