पुढील महिन्यात मोठी घटना घडण्याची शक्यता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

पुढील महिन्यात मोठी घटना घडण्याची शक्यता असून तशी योजना आखण्यात येत आहे. मी गंभीरपणे हा आरोप करीत असून...
पुढील महिन्यात मोठी घटना घडण्याची शक्यता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

पुणे/सातारा : पुढील महिन्यात मोठी घटना घडण्याची शक्यता असून तशी योजना आखण्यात येत आहे. मी गंभीरपणे हा आरोप करीत असून सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी काही अनुचित घटना घडवण्याचा काही शक्तींचा डाव आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सातारा येथील सभेत बोलताना केला.

धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा काँग्रेससह इंडिया आघाडीचा डाव आहे, पण मी जिवंत असेपर्यंत तो यशस्वी होऊ देणार नाही. भारताचे संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नाकारते. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे. परंतु, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबीसींना दिलेल्या २७ टक्के आरक्षणात एक फतवा काढून मुस्लिमांचा ओबीसीमध्ये समावेश केला. काँग्रेस असाच प्रकार देशात करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभेच्या सुनेत्रा पवार, शिरुर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ लोकसभेचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीरसभा झाली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजप महायुतीच्या घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणत, या भूमीने महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढं प्राचीन आणि तेवढंच फ्युचरिस्टिक आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

१९९५ मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, हा ‘भटकता आत्मा’ तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होता. २०१९ मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या २५ ते ३० वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुया. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र, अर्ध्या लोकसंख्येला प्राथमिक सुविधाच नव्हत्या. आम्हाला १० वर्षे जनसेवेची संधी मिळाली. या काळात मूलभूत गरजा आम्ही पूर्ण केल्याच. शिवाय प्रत्येक घटकांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. आज शहर अथवा गावातील आधुनिक पायाभूत सुविधा पाहून कुणाचेही मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. मेट्रो, पालखी मार्ग, एअरपोर्ट, समृद्धी महामार्ग, वंदे भारत ट्रेन हा आधुनिक भारताचा चेहरा आहे. ही मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेसने दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला, तितका आम्ही केवळ एक वर्षांत केला, असा दावाही त्यांनी केला.

येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल

२०१४ आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. ‘मेड इन इंडिया चिप’ही जगभरात निर्यात केली जाणार आहे. देशाला तरुण पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

लोकांचा मोदींवर विश्वास - मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाण, घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत, विकासाला मत. लोकांचा विश्वास मोदींवर आहे, देश मोदींवर प्रेम करत आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’, ही मोदींची कामाची पद्धत आहे. त्यांनी राम मंदिर उभारले, ३७० कलम हटविले.

विरोधक आळीपाळीने पंतप्रधान व्हायच्या तयारीत आहेत - फडणवीस

विरोधक सगळेच आळीपाळीने पंतप्रधान व्हायच्या तयारी आहेत. विरोधकांच्या गाडीला डब्बेच नाहीत. शरद पवारांच्या गाडीत फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. राहुल गांधींच्या गाडीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीसाठी जागा आहे तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांच्या कोणाच्याच गाडीत सर्वसामान्यांना जागा नाही आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

भटकत्या आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिर केले

महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राज्याचे राजकारण अस्थिर झाले आहे. महाराष्ट्रातील या नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हा ‘भटकता आत्मा’ केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाही, तर स्वतःच्या पक्षाला, कुटुंबालाही अस्थिर करत आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in