नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील औषध तुटवड्यावरुन तानाजी सावंत यांना चांगलंच धारेवर धरलं. औषधांचं वाटप हे आरोग्य शिबिरांमध्ये केलं जातं, असा आरोप शिंदे यांनी केला. यानंतर तानाजी सावंत यांनी तुम्हाला आरोग्य शिबिराचा त्रास होणं स्वाभाविक आहे, असं प्रत्युत्तर प्रणिती शिंदे यांना दिलं. यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना चांगलंच धारेवर धरलं.
सभागृहात नेमकं काय घडलं?
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हिमोग्लोबीन कमी झाल्यावर लोहाची औषधं घ्यावी लागतात. पण, सोलापूर आणि सगळीकडे आरोग्य शिबिरांची संख्या वाढली आहे. आजार नसतानाही लोह आणि साखरेच्या गोळ्यांचं वाटप या शिबिरांमध्ये केलं जातं. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयात गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरोदर महिलांना लोहाच्या गोळ्या उपलब्ध होत नाही. शिबिरांमध्ये मुदत संपलेल्या गोळ्यांचं देखील वाटप केलं जातं.
त्या पुढे म्हणाल्या, जनतेला व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सिव्हिल रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन बंद आहे. रुग्णालयात खासगी ठिकाणी सीसी स्कॅनसाठी पाठवण्यात येतं. सीसी स्कॅन नाही, गोळ्या नाहीत, मग आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर फक्त शिबिरांसाठी करणार आहात का? असा संतप्त सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
तानाजी सावंत यांचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर
प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना आरोग्य मंत्री तानाजी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, सिव्हील रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. आम्ही जनतेची सेवा करत असल्यानं तुम्हाला आरोग्य शिबिरांचा त्रास होणं साहजिक आहे. शासकीय विभागातील कुठलीही औषधं शिबिरांमध्ये वापरली जात नाहीत. सेवाभागी संस्थांकडून घेऊन औषधं वाटली जातात.तसंच सिव्हिल रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं प्रणिती शिंदे यांचं एकही पत्र मला मिळालं नाही.
विधानसभा अध्यक्षांनी आरोग्यमंत्र्याचे कान टोचले
प्रणिती शिंदे यांचं पत्र मिळालं नसल्याचं प्रत्युत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सावंत यांचे चांगलेच कान टोचले. सकारकडून काम अपेक्षित असतं. तेव्हा, विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं, तरच काम करावं, हे अपेक्षित नाही. प्रणिती शिंदे यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबात उचित कारवाई करावी, असे निर्देश नार्वेकरांनी तानाजी सावंत यांना दिले आहेत. यावर तानाजी सावंत यांनी माहिती घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असं सांगितलं.