अब की बार ४५ पार..!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नारा,शिवसंकल्प अभियानाला सुरुवात

‘‘खोटे बोलून ज्या लोकांनी शिवसेना-भाजप युती तोडली, लाखो शिवसैनिकांचा अपमान आणि विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.''
अब की बार ४५ पार..!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नारा,शिवसंकल्प अभियानाला सुरुवात
Published on

पुणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आपल्याला लढाऊ बाणा दिला. त्यांचीच प्रेरणा घेऊन राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. हेच काम आपल्याला पुढेही करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे ‘अब की बार ४०० पार’, तर ‘अब की बार ४५ पार’ हा महाराष्ट्राचा नारा आपल्याला द्यायचा आहे, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून शनिवारी शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाची सुरुवात झाली. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘खोटे बोलून ज्या लोकांनी शिवसेना-भाजप युती तोडली, लाखो शिवसैनिकांचा अपमान आणि विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठीच आपण हे शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. नुकतेच पालघर आणि परभणी येथील ५० नगरसेवकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. रोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मी चुकीचे पाऊल उचलले असते, तर एवढा विश्वास माझ्यावर दाखवला असता का? मी माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांना आश्वासन देतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवत आहात, तो सार्थ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.’’

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मी दीड वर्षांपूर्वी जी भूमिका घेतली, ती प्रामाणिकपणे शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचविण्यासाठी आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतली होती. मला ना सत्तेचा मोह होता, ना पदाचा. मी नगरविकास मंत्री होतो. पण, त्या मंत्रिपदावर लाथ मारून आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो. आम्ही हे पाऊल उचलले नसते तर ही शिवसेना रसातळाला गेली असती. मी बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे.’’

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लावू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महिलांना एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सूट देण्याचे काम आपण केले. बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या देखील आपण अनेक योजना आणल्या आहेत. अंगणवाडी सेविकांचा विषय देखील सरकारने हाती घेतलेला आहे. तो विषयही लवकरात लवकर सोडवू. शासन आपल्या दारी योजनेचा महाराष्ट्रातील २ कोटी १९ लाख लोकांनी लाभ घेतला आहे. आपल्याला शिवदूत बनून केलेले काम लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे व आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला नक्की मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in