२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ नेते मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या शपथविधीला १० दिवस उलटले असूनही अद्याप शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणत्याही खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला नाही. आधीच मंत्रिमंडळाला विस्तार प्रलंबित असताना खातेवाटपाची प्रतीक्षा ताणली जात आहे.
मंत्री उदय सामंत यांनी येत्या काही दिवसांत खातेवाटप होईल, असं सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांना कोणतीह खाती मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ७ जुलै रोजी राज्यसरकारकडून एका जीआरमधील एका समितीचा उल्लेख करण्यात आला होता. या वित्तमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे अर्थखात्यासह शिंदेगट व भाजपकडील एकूण ९ खाती अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला मिळणाऱ्या खात्यामध्ये अर्थ खात, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पर्यटन विभाग, क्रीडा विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, औषध प्रशासन विभाग या खात्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे सरकारमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्याकडे जी खाती होती. आता देखील त्यांच्याकडे तीच खाती दिली जाण्याची शक्यता आहे.