
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचं दिसून येत आहे. दोन्ही गटांकडून नेहमी एकमेकांना आव्हान दिलं जातं. शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान दिलं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना दिसत आहे. अशात आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर माध्यमांनी आदित्य यांना याबाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यातून निवडणूक लढणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आदित्या म्हणाले, मी ठाण्यातून निवडणूक लढवणार अशी लोकांमधून चर्चा पुढे येत असते. त्यावर काय होतं ते आगमी काळात बघू. लोकशाही आहे की, हुकुमशाही सुरु आहे. हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात आपण पाहतोय की, गद्दारांचं गँगस्टर सरकार आहे. बिल्डर-काँट्रॅक्टर सरकार आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना आदित्य यांनी महिला आरक्षणावर देखील भाष्य केलं. संसदेत मांडण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक जुमला आहे. महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र हा जुमला तर नाही ना, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. जनगणना कधी होणा, मग पुनर्रचना कधी होणार? ही सर्व कार्यवाही झाल्यावर महिला आरक्षण मिळेल. त्यामुळे निवडणुकीपुरता एक जुमला असल्याची टीका त्यांनी केली.