आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान ; शिंदे मात्र...

आम्ही पेंग्विन आणल्याने बीएमसीला ५० कोटी मिळाल्याचं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान ; शिंदे मात्र...

ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप प्रणित शिंदे सकारला चांगचलं धारेवर धरलं आहे. नांदेडच्या मृत्यूंबद्दल कोणी बोलायला तयार नाही. राज्य सरकारने या प्रश्नावर मौन बाळगलं असल्याची टीका त्यांनी केली. आज मुंबईतील ग्रँड हयात येथे आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एनडीए आघाडीच्या नेत्यांचे म्हणणं आहे की, इंडिया आघाडीची स्थापना फक्त पंतप्रधान मोदींचा विरोध करण्यासाठी झाली आहे. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. इंडिआ आघाडीच्या नेत्यांची विचारसरणी वेगळी आहे. तरीदेखील सर्वांनी एकत्र येऊन आघाडी केली. इंडिया आघाडीत सर्वांचा आवाज ऐकला जातो. एकच व्यक्ती सर्व निर्णय घेत नाही. एनडीएत एकच व्यक्ती सर्व निर्णय घेतो. त्याठिकाणी कोणाचाही आवाज ऐकला जात नाही, असं आदित्य म्हणाले.

भारतीय जनात पक्षावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदुत्व पूर्णपणे वेगळं आहे. आम्ही बलात्कार करणाऱ्यांचं स्वागत करत नाही. मग ती बिल्किस बानो असो वा अन्य कोणी.. आमचं हिंदुत्व 'प्राण जाए, पर वचन न जाए', या गोष्टीचं पालन करतं. केंद्र सरकार राम मंदिराचा मुद्दा विसरलं होतं, तेव्हा आम्हीच हा मुद्दा उपस्थित केला होता. अशी आठवण देखील आदित्य ठाकरे यांनी करुन दिली.

मुख्यमंत्र्यांना आव्हान

इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंचं सेशन एकापाठोपाठ होतं. यावर एकत्र सेशन करु, मी एकटा बसतो. त्यांचा बाजूने येतील तेवढे येऊ द्या. असं आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे हे आले नाहीत. आदित्य ठाकरे यांचं सेशन संपायला आलं तेव्हा निवेदिकेनं सांगितलं की, एकनाथ शिंदे यांना अचानक दिल्लीला जावं लागल्याने ते येऊ शकत नाहीत.

पेंग्विन पालिकेला ५० कोटींचं उत्पन्न

विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांना नेहमी पेंग्विन म्हणत खिल्ली उडवली जाते, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नवरही त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, आम्ही पेंग्विन आणल्याने बीएमसीला ५० कोटी मिळाले. आम्हाला प्राणी संग्रहालयात बरेच प्राणी मिळाले. आज किमान ३० हजार लोक प्राणी संग्रहालयाला भेट देत आहेत. महापालिकेला त्यातून उत्पन्न सुरु झालं आहे. मात्र, देशात आणलेल्या चित्त्यांचं काय झालं, आधी ते पहा, असं म्हणत आदित्य यांनी भाजप नेत्यांना कोपरखळी मारली.

logo
marathi.freepressjournal.in