

पिंपरी: राज्यात २०१९ मध्ये ‘कट्यार पाठीत घुसली’, हा प्रयोग झाला. मग २०२२ साली आम्ही प्रयोग केला, ‘आता होती गेली कुठे?’ त्यामुळे अशाप्रकारचे प्रयोग चालूच असतात,” असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की ‘सिंहासन’ सिनेमा आठवतो. पण, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडली नाही. पूर्वीच्या काळी नाट्यसंमेलनात राजकीय नेत्यांना बोलावण्यावरून खूप वाद व्हायचे. वृत्तपत्रांमध्ये मथळेच्या मथळे छापण्यात येत होते. पण, अलीकडे हे कमी झालंय, कारण तुम्ही आम्हाला आपल्यातील एक समजता. तुमचा ठाम विश्वास झाला की, हे नाटक करतातच. त्यामुळे राजकीय नेत्यांना नाट्य संमेलनात बोलावलं पाहिजे.”, असे फडणवीस म्हणाले.
प्रशांत दामले शनिवारी म्हणाले, ‘अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटले. ही कला आमच्या राजकारणातील काही लोकांना दामलेंनी शिकवावी. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की, किती प्रश्न सुटतील. पण, तुम्ही असे मुख्यमंत्री आहात, जे जनतेला हसवतात, रडवतात आणि संवेदनशिलतेसाठी तुमचे कार्य महत्वाचं आहे,” असं कौतुक फडणवीसांनी केलं.