नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित डोवाल यांना तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पी. के. मिश्रा यांना कायम ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डोवाल व मिश्रा यांच्या पुनर्नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला.
१९६८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले डोवाल हे राजनैतिक व दहशतवादविरोधी धोरणातील तज्ज्ञ आहेत. डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य व गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी पाहणार आहेत. डोवाल यांना २० मे २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ म्हणून नियुक्त केले गेले होते. माजी आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा हे १० जून २०२४ पासून पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव असतील. मिश्रा हे १९७२ चे आयपीएस अधिकारी आहेत. ते गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. मिश्रा हे प्रशासन व पंतप्रधान कार्यालयातील नियुक्तीचे काम पाहतील.