Ajit Pawar: फडणवीसांनी लिहलेल्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "जो काही निर्णय घ्यायचा..."

नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
Ajit Pawar: फडणवीसांनी लिहलेल्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "जो काही निर्णय घ्यायचा..."

काल पासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून नवाब मलिक हे कोणाच्या बाजूला बसणार हा प्रश्न सगळयांना पडला होता. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी जाऊन बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भूमिका जाहीर केली होती. मलिक हे सध्या जामीनावर बाहेर आले आहेत आणि ते आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत आहे.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यावरुन नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते आणि निघून जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहलेल्या मलिकांसंबधीच्या पत्रावर अजित पवारांनी आज काही माध्यमांशी बोलताना त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रावर अजित पवार म्हणाले की, यांनी पाठवलेल्या पत्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं पत्र मला मिळाले आहे. ते मी वाचले आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदांच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांनी मत आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन', असं अजित पवार म्हणाले आहेत.

'त्या पत्रावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी घेईनच. विधानसभेत कुणी कुठल्या बाकावर बसायचे हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर नवाब मलिकांची भूमिका काय? ते ऐकल्यानंतर मी याबद्दल निर्णय घेणार आहे', असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

logo
marathi.freepressjournal.in