
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी ३० आमदारांना सोबत घेत शिंदे सरकारशी हातमिळवणी केली आहे. यानंत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी अजित पवार यांचे स्वागत केले असले तरी प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता वाढली आहे. विरोधात राहून काहीच फायदा नाही, म्हणून विकासाचं राजकारण केलं पाहिजे, असं अजित पवार यांनी कळवलं असून एकनाथ शिंदे यांच्या विकासाच्या लाटेत अजित पवार सामील झाले असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसंच काल खोके सरकार म्हणणारे आज ओके म्हणत सरकारमध्ये आले, त्यांचं स्वागत आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
मागील वर्षी झालेल्या सत्तांतराच्या वेळी एकनाथ शिंदे यांना साथ देण्यात बच्चू कडू आघाडीवर होते. यावेळी बच्चू कडू यांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आलं. यावरुन त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. अलिकडे त्यांची मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या 'दिव्यांग कल्याण विभागा'चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र, याने देखील त्यांचे कार्यकर्ते समाधानी नाहीत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद तसंच अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संधी मिळाली होती. यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत निधीच्या वाटपावरुन अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अकोल्याला मिळालेल्या निधीवरुन असमाधानी असलेल्या बच्चू कडू यांनी आक्रमक होत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
महाविकास आघाडीसोबत फार्कत घेताना शिंदे यांच्यासह गेलेल्या आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निधीवाटपावरुन दुजाभाव केल्याची टीका केली होती. विशेषकरुन अजित पवार यांच्याकडे या आमदारांचा रोख होता. आता तेच अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याने या आमदारांची गोची होण्याची शक्यता आहे. तसंच यावरुन ठाकरे गट तसंच काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.