राजा माने/मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही आता मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच्या आवेशात शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताना ८० वर्षे वय झाले तरी माणूस थांबायला तयार नाही, असा टोला लगावला. त्यावर लगेचच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाप हा बाप असतो, तो कधीच रिटायर होत नसतो, अशा शब्दांत आक्रमकपणे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या पुढे हा कलगीतुरा चांगलाच रंगताना दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा रविवारी कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांनाच लक्ष्य केले. वय झाल्यावर थांबले पाहिजे. त्यांना घरी बसून मार्गदर्शन करता येते. काही जण ७० वर्षे झाले की थांबतात, काही ७५ वर्षे झाले की थांबतात. पण, काही जण ८० वर्षे झाले तरी थांबायचे नाव घेत नाहीत. ऐकायला तयारच नाहीत. हट्टीपणा करतात, असा टोला लगावतानाच मी देखील ५ वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी चांगले काम करीत आहेत, असे सांगत आपण लोकांच्या कल्याणासाठी सत्तेत गेल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल महापुरुषांच्याच विचारावर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मीयांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. याच मार्गावर राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. तसेच शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. आता कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच वाटचाल सुरू असल्याचे सांगताना आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असून, जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार यांनी यावेळी केला.
बाप हा बापच असतो
बाप हा बापच असतो. तो कुटुंबातील ऊर्जास्रोत असतो. तो कधीच रिटायर होत नाही आणि बापाला रिटायरही करायचे नसते, असे सांगत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन गटातील वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.
अजित पवार अपघाताने सत्तेत
‘अजित पवार हे अपघाताने सत्तेत आले आहेत. त्यांना आम्ही सरकार मानतच नाही. अजित पवार यांनी पहिल्यापासून हेच केले आहे. ते पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले आहेत, असा घणाघात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुंबईत येताना जर कुणी कायदा हातात घेणार असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्यावर जरांगे पाटील यांनी आता अजित पवारांच्या पोटातील ओठावर आले असल्याचा आरोप केला. बीड दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांनी हा निशाणा साधला.