अमित शहांनी 'डीएम'ना दूरध्वनी केल्याचा आरोप, EC ने जयराम रमेश यांच्याकडून माहिती मागवली

अमित शहांनी 'डीएम'ना दूरध्वनी केल्याचा आरोप, EC ने जयराम रमेश यांच्याकडून माहिती मागवली

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यापूर्वी १५० जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आणि जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी केल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शनिवारी केला होता.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यापूर्वी १५० जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आणि जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी केल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शनिवारी केला होता. याबाबत वस्तुस्थितीजन्य माहिती सादर करावी, असे निवडणूक आयोगाने (ईसी) रविवारी जयराम रमेश यांना एका पत्राद्वारे कळवले आहे.

मावळते गृहमंत्री अमित शहा हे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करीत आहेत, आतापर्यंत शहा यांनी १५० जणांना दूरध्वनी केले. हा भीती घालण्याचा प्रकार असून, त्यावरून भाजप किती उतावीळ झाला आहे ते स्पष्ट होते. ४ जून रोजी मोदी, शहा आणि भाजपला बाहेरचा रस्ता धरावा लागेल हे यावरून स्पष्ट होत आहे, असे जयराम रमेश यांनी १ जून रोजी 'एक्स'वर म्हटले होते. जयराम यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचेही म्हटले होते. निवडणूक आयोगाने रविवारी जयराम रमेश यांच्या या दाव्याची दखल घेतली व आयोगाने जयराम रमेश यांना पत्र लिहून त्यांच्या दाव्याशी संबंधित तपशील सादर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याप्रकरणी योग्य ती कारवाई करता येईल.

निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारे वक्तव्य

आयोगाने जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आचारसंहिता लागू असताना सर्व अधिकारी निवडणूक आयोगाला अहवाल देतात. तुम्ही दावा करत आहात तशी माहिती आतापर्यंत कोणत्याही ‘डीएम’ने दिलेली नाही. तुमच्या अशा विधानांमुळे या निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होतो. त्यामुळे या विधानाच्या अनुषंगाने असलेली वस्तुस्थितीजन्य माहिती सादर करण्यात यावी.

logo
marathi.freepressjournal.in