शिवीगाळ प्रकरण पेटले! विधान परिषदेत अंबादास दानवे, प्रसाद लाड यांच्यात ‘हमरीतुमरी’

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विधान परिषदेच्या कामकाजाशी काही संबंध नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी आक्षेप घेत दानवे यांनी शिवीगाळ केला, असा आरोप केला.
शिवीगाळ प्रकरण पेटले! विधान परिषदेत अंबादास दानवे, प्रसाद लाड यांच्यात ‘हमरीतुमरी’
Published on

मुंबई : काँग्रेसचे नेते तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विधान परिषदेच्या कामकाजाशी काही संबंध नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी आक्षेप घेत दानवे यांनी शिवीगाळ केला, असा आरोप केला. त्यानंतर शिवीगाळ प्रकरण विधान परिषदेत चांगलेच तापले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत दानवे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा सभागृह चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिला. दरम्यान, राजकीय दंगलीचे ७५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत, शिवसैनिक आहे, भाजपने हिंदुत्व शिकवू नये, असे सांगत अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना वक्तव्य केले की, “काही लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात आणि २४ तास हिंसा आणि द्वेष करत राहातात.” राहुल गांधींच्या या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विधान परिषद सभागृहात उमटले. आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटा प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले होते. यावेळी बोलायला उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रसाद लाड यांनी हात दाखवला. यावरून दानवे आक्रमक झाले आणि त्यांनी प्रसाद लाड यांना शिव्या घातल्या. दानवे यांच्या शिवीगाळनंतर लाड आक्रमक झाले आणि ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अभद्र भाषेचा वापर केला. त्यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत विरोध केला. अशाप्रकारे हिंदूंचा अपमान सभागृहात आणि देशात सहन केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. गटनेते प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि सर्व सदस्यांनी सभागृहासमोर हा विषय ठेवला. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पण पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आणि राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करून लोकसभेत पाठवला जावा, अशी मागणी केली. तसेच विरोधी पक्षनेत्याने यावर उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

बोट तोडायची ताकद माझ्यात -दानवे

“माझा तोल सुटलेला नाही, मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोण बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. जो या सभागृहाचा विषय नव्हता, सभापतींना बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करून बोलायचा अधिकार नाही. मग माझा, आमदार विरोधी पक्षनेता नंतर सगळ्यात मी आधी शिवसैनिक आहे. हे आता मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर देखील हिंदूत्वासाठी ७५ केसेस आहेत, अनेकदा तडीपारीच्या केसेसला सामोरे गेलेलो आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी काय आरोप केले, याला मी फारसे महत्त्व देत नाही,” असेही अंबादास दानवे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in