मनसे नेत्यांनी घेतला जितेंद्र आव्हाड यांचा समाचार; म्हणाले, "महाराष्ट्राला लागलेली..."

मनसैनिकांचा संयम सुटला तर तुम्हाला पळणं मुश्किल होईल, असा इशारा खोपकर यांनी आव्हाड यांना दिला आहे.
मनसे नेत्यांनी घेतला जितेंद्र आव्हाड यांचा समाचार; म्हणाले, "महाराष्ट्राला लागलेली..."
Published on

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाढदिवशी दिलेल्या खोचक सल्ल्यावरुन मनसे नेते आक्रमक झाले आहेत. यावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विखारी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. काल एवढा चांगला वाढदिवस साजरा होत असताना मनसैनिकांची खोडी काढण्याची काय गरज आहे? राज ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांची पात्रता नाही. मनसैनिकांचा संयम सुटला तर तुम्हाला पळणं मुश्किल होईल, असा इशारा खोपकर यांनी आव्हाड यांना दिला आहे.

याविषयावर पुढे बोलताना ते म्हणाले, नागाने फणा काढल्यासारखा जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा आहे. त्यांनी हा थिल्लरपणा बंद करावा. उगाच महाराष्ट्राच्या उकिरड्यावर सतत बोलत असतात. गल्लीत बसून महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांवरती चहा पीत अशी वक्तव्य करणं आव्हाड यांना शोभत नाही. गल्लीच्या कोपऱ्यावरती बसून टपल्या मारत बसायचे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे. त्यांनी आता शांत रहावं, अन्यथा! त्यांना मनसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं देखील ते म्हणाले आहेत.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील आव्हाड यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवणार आहोत. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहतात आणि आमच्यावर टीका करतात, असं काळे यांनी म्हटलं आहे.

याविषयी पुढे बोलताना काळे म्हणाले की, कार्यकर्त्यांना घरी आणून मारहाण करणं ही जितेंद्र आव्हाड यांची अक्कल आहे. त्यामुळे त्यांनी नक्कलवर बोलू नये. स्वत:च्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असं देखील गजानन काळे म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in