अमित शहा आज मुंबईत ; राजकीय वर्तुळातील धाकधूक वाढली

राज्याच्या सर्व १८ मंत्र्यांना भेटणार असून, पालक मंत्री या नात्याने त्यांनी केलेल्या कामाचा ते आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले
अमित शहा आज मुंबईत ; राजकीय वर्तुळातील धाकधूक वाढली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवार, १५ आणि रविवार, १६ एप्रिल असे दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील संवेदनशील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृह येथे शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्याच्या सर्व १८ मंत्र्यांना भेटणार असून, पालक मंत्री या नात्याने त्यांनी केलेल्या कामाचा ते आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. भाजपचे चाणक्य अमित शहा हे या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर येत असल्याने राजकीय धाकधूक वाढली आहे.

अमित शहा यांचे शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते मुक्कामासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे येतील. कार्यक्रम पत्रिकेत रात्री साडेनऊपर्यंतचा वेळ राखीव दाखवण्यात आला आहे. मात्र, सर्व १८ मंत्र्यांना शहा यांच्या भेटीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. रात्री होणाऱ्या बैठकीत सरकारने ९ महिन्यांत केलेल्या कामांची शहा माहिती घेणार आहेत. तसेच पालक मंत्री या नात्याने लोकसभा मतदारसंघात २०२४ लोकसभा निवडणुकासाठी काय काम केले, याची ते सर्व मंत्र्यांकडून माहिती घेणार असल्याचे समजते.

रविवारी सकाळी राजभवन येथील हेलिपॅडवरून ते नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क येथे पोहोचतील. सकाळी साडेदहा वाजता येथे डॉ. दत्तात्रय नारायण ऊर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तेथून शहा हे हेलिकॉप्टरने गोव्याला जाणार आहेत. अमित शहा यांच्या बैठकीत काय विचारले जाईल, यासंदर्भात सर्व मंत्र्यांना धाकधूक आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात पक्षासाठी केलेल्या कामांची तसेच विभागातील योजनांची माहिती अद्ययावत ठेवली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण अतिशय संवेदनशील बनले आहे. पडद्याआडील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे भवितव्य लवकरच ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन राजकीय प्रयोग होणार का, याबाबतच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. अमित शहा याबाबतीत भाजपचे चाणक्य मानले जातात. नेमक्या याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या मुंबई भेटीला महत्त्व आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in