मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

७५ वर्षांवरील व्यक्तीला राजकीय पद द्यायचे नाही, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली घेतला होता.
मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा

नवी दिल्ली : ७५ वर्षांवरील व्यक्तीला राजकीय पद द्यायचे नाही, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली घेतला होता. आता २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी हे स्वत: ७५ वर्षे पूर्ण करतील. त्यामुळे ते निवृत्त होऊन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.

पंतप्रधानपदी मोदीच राहतील-अमित शहा

केजरीवाल यांच्या दाव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अरविंद केजरीवाल व ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना सांगू इच्छितो, भाजपच्या घटनेत ७५ वर्षी निवृत्त करण्याचा नियम नाही. भविष्यात देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील. देशात या प्रकरणी कोणताही भ्रम नाही. केजरीवाल यांना केवळ प्रचारासाठी हंगामी जामीन मिळाला आहे. त्यांना मद्य घोटाळयातून मुक्त केलेले नाही, असा टोला शहा यांनी लगावला.

ठाकरे, ममता, तेजस्वी तुरुंगात जातील

देशातील सर्व नेत्यांना संपवण्याचा डाव भाजपने आखला आहे. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास काही दिवसात शिवसेना नेते उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, तेजस्वी यादव यांच्यासमवेत सर्व नेते तुरुंगात जातील.

‘एक देश-एक नेता’ धोकादायक मोहीम

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक देश-एक नेता’ अशी धोकादायक मोहीम सुरू केली आहे. ते देशातील सर्व नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना तुरुंगात टाकतील तर भाजप नेत्यांचे राजकारण संपवतील. मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण आडवाणी यांना निवृत्त केले तर रमण सिंह, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचे राजकारण मोदींनी संपवले आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप विजयी झाल्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन महिन्यात पदावरून हटवले जाईल.

७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मोदी पदावरून दूर होतील, योगींना दोन महिन्यात पदावरून हटवले जाईल

तुरुंगातून जामीनावर सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात पूजा-अर्चा केली. त्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी भाजपवर आरोपाच्या फैरी झाडत टीकेची झोड उठवली.

भाजपवाले ‘इंडिया’ आघाडीला विचारतात, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? मी भाजपला विचारतो, तुमचा पंतप्रधान कोण असेल. कारण पंतप्रधान मोदी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावरून दूर होतील. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले. आता मोदी हे अमित शहा यांच्यासाठी मते मागत आहेत, असा दावा त्यांनी केला. ‘आप’च्या ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. आमच्या पक्षाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व चोरी करणाऱ्या नेत्यांना भाजपात सामील करून घेण्यात आले, असा आरोप केजरीवाल यांनी केला. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मी १४० कोटी जनतेकडे भीक मागत आहे. मी नोकरी सोडून मंत्री, मुख्यमंत्री बनायला आलो नाही. माझे जीवन देशासाठी अर्पण करायला आलो आहे. आपला देश ४ हजार वर्षे जुना आहे. या देशात कोणीही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा जनतेने त्यांना धडा शिकवला. माझ्या रक्तातील प्रत्येक थेंब हा देशासाठी आहे.

‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार

४ जूननंतर भाजपचे सरकार सत्तेवरून जाईल. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड, यूपी आणि अन्य राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. त्यामुळे देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनणार आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर गेल्या २० तासात मी अनेक लोकांशी बोललो, त्यावरून असा अंदाज येतो की, ४ जून नंतर भाजपचे सरकार येणार नाही. सट्टा बाजारानुसार २२० जागा येऊ शकतात, असे ते म्हणाले. मला तुरुंगात पाठवून दिल्लीत माझे सरकार पाडायचा कट होता. त्यामुळेच तुरुंगात जाऊनही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in