उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात गुफ्तगू ; वंचित मविआत येणार की ठाकरे गटासोबत राहणार ?

आगामी मुंबई महापालिका तसेच इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीला महत्व आहे. आगामी निवडणुकांमधील आघाडीच्या संदर्भाने या बैठकीत चर्चा
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात गुफ्तगू ; वंचित मविआत येणार की ठाकरे गटासोबत राहणार ?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात सोमवारी महत्वपूर्ण बैठक झाली. राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर या बैठकीला फार महत्व आले आहे. आगामी मुंबई महापालिका तसेच इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीला महत्व आहे. आगामी निवडणुकांमधील आघाडीच्या संदर्भाने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आता वंचित थेट महाविकास आघाडीत सहभागी होणार की शिवसेनेसोबत युती करणार, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यावरच भीमशक्ती-शिवशक्ती पार्ट टू चे भवितव्य ठरणार आहे.

प्रबोधनकार ठाकरेंवरील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे एका मंचावर आले होते. तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी वंचितला सोबत घेण्याचे सूतोवाच केले होते. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नवीन मित्र जोडण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्याचाच परिपाक म्हणून वंचित सारख्या अनपेक्षित पक्षालाही उद्धव ठाकरे यांनी साद घातली आहे. पुढील आघाडीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक पार पडली. बैठकीचा तपशील मात्र बाहेर आलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, खा.विनायक राऊत उपस्थित होते. वंचित ठाकरे गटासोबत आल्यास दलित आणि मुस्लिम मतांचा फायदा होऊ शकतो, असा कयास आहे, मात्र वंचित शिवसेनेसोबत आघाडी करणार की थेट महाविकास आघाडीत येणार, हाच महत्वाचा प्रश्न आहे. बैठकीत या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे समजते.

शिवसेनेतील बंडानंतर भाजप तसेच शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे हे नवीन मित्रांच्या शोधात आहेत. त्यासाठीच त्यांनी वंचितला साद घातली आहे. ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजप या सगळ्यांसाठी आगामी मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीसाठी हे तिघेही सर्व पर्यायांची चाचपणी करत आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीतील मुद्द्यांवर आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा होईल. हे मुद्दे मान्य असले तरच पुढील चर्चांच्या फेऱ्या सुरू होतील. येत्या काही दिवसांतच या भीमशक्ती-शिवशक्ती पार्ट टू चा प्रयोग यशस्वी होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

जागा वाटपाचे काय?

वंचित बहुजन पक्ष महाविकास सहभागी होण्याबाबत आघाडीच्या एकत्रित बैठकीत चर्चा होणार आहे. आघाडी म्हटले की निवडणुकीत जागा सोडाव्या लागणार आहेत. वंचितसाठी त्या शिवसेनेने सोडायच्या की महाविकास आघाडीने, हा कळीचा मुद्दा असणार आहे. कारण वंचितकडून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या जागांवर दावा करण्यात येऊ शकतो. आघाडी करायची असेल तर नेमकी काय तडजोड करायची, हे ठरवावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in