
वसई : वसई विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, तथा मावळते आमदार हितेंद्र ठाकूर आणि महाविकास आघाडीचे तिसऱ्या क्रमांकावर गेलेले पराभूत काँग्रेस उमेदवार विजय पाटील अशा दोघांनीही फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहे. वसईतून प्रथमच महायुतीच्या स्नेहा दुबे-पंडित या विजयी झाल्या असून, त्यांनी बविआचे विद्यमान आ. हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी, तर काँग्रेसचे अन्य उमेदवार विजय पाटील यांचा १५,२२९ मतांनी पराभव केला होता. वसईत ईव्हीएम मशीनमधून झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅट (मतदान चिठ्ठी) यांची जुळवणी व्हावी, अशी मागणी आ. हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.
बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील उमेदवार, माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि बोईसरचे उमेदवार, आमदार राजेश पाटील या दोघांचाही यंदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला असून, त्यांनीही फेरमातमोजणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.
ईव्हीएम मशीनमधून झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅट (मतदान चिठ्ठी) यांची जुळवणी व्हावी, अशी मागणी आ. हितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, मात्र तशी तरतूद निवडणूक आयोगाच्या नियमावलीत नसल्याचे समजते.
वसई मतदारसंघातून एकूण २,१९,२२० इतके मतदान झालेले होते. बविआचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर, काँग्रेसचे विजय पाटील आणि भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित या प्रमुख उमेदवारांसह चार अपक्ष मिळून एकूण सात उमेदवार वसईतून निवडणूक लढवीत होते. अंतिम निकालानुसार भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांना ७७,५५३ मते मिळून विजयी झाले, तर बविआचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव झाला, तर काँग्रेसचे विजय पाटील यांना ६२,३२४ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
३५ वर्षांनंतर वसईच्या रिंगणात भाजपचा उमेदवार
वसईतून सहा वेळा विजयश्री खेचत, यंदा हितेंद्र ठाकूर सातव्यांदा निवडणूक लढवीत होते. तर वसईतून दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे विजय पाटील यांनी २०१९ साली शिवसेना उमेदवार म्हणून लढताना, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव पत्करला होता. माजी आमदार विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित या महायुतीच्या भाजप उमेदवार म्हणून यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवीत होत्या. माजी मंत्री तारामाई वर्तक यांच्यानंतर ४० वर्षांनी वसईतून प्रथमच दुबे-पंडित यांच्या रूपात महिला उमेदवार लढत होता, तर ३५ वर्षांनंतर प्रथमच भाजपचा उमेदवार वसईच्या रिंगणात होता.