कलाकारांनी आपल्या कलाकारांना बोलताना मान द्या - राज ठाकरे

"कलाकार आपल्या कलाकार मित्रांचा मान राखत नाहीत. त्यांना शॉर्टफॉर्ममध्ये हाक मारतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही, तर प्रेक्षक तुम्हांला मान देतील का?
कलाकारांनी आपल्या कलाकारांना बोलताना मान द्या - राज ठाकरे
Published on

संजय कुळकर्णी

(श्री मोरया क्रीडा संकुल चिंचवड वरून )

१००व्या नाट्य संमेलनच्या समारोपाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखत झाली. मुलाखतीत त्यांना विचारलेल्या आणि न विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देताना टपल्या, टिचक्या सुद्धा मारल्या. त्यांनी थेट स्पष्टपणे व्यक्त केलेल्या मतांना अलोट गर्दी असणाऱ्या प्रेक्षकांनी दाद दिली.

राजकारणातील राज ठाकरे हे एकमेव नेता असेल, ज्यांना नाट्यसृष्टीची जाणं आहे. कलाकारांबद्दल जिव्हाळा आहे, प्रेम आहे. कलाकारांनाच उद्देशून राज ठाकरे म्हणाले, "कलाकार आपल्या कलाकार मित्रांचा मान राखत नाहीत. त्यांना शॉर्टफॉर्ममध्ये हाक मारतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही, तर प्रेक्षक तुम्हांला मान देतील का? मान द्यायची पद्धत सुरू केली पाहिजे. आपलं मोठेपण कलाकारांनी जपलं पाहिजे. ही शपथ १००व्या नाट्य संमेलनापासून घेतली पाहिजे."

नाटकाबद्दल राज ठाकरे म्हणाले, "नाटकात कधीही रिटेक नसतो. एका चौकोनात सर्व आशय आणतात ही सोप्पी गोष्ट नाही. सर्व आशय एकत्र आणतात. नाट्यक्षेत्र ही मोठी ताकद आहे. कठीण माध्यम क्षेत्र आहे. माझ्यावर निगेटिव्ह सिनेमा आलेत, पण मी ते कधीही बंद पाडले नाहीत. तसेच लेखकांनी मोठे विषय हाताळले पाहिजेत. मोठी उडी घेतली पाहिजे."

सेंसॉरशीपबद्दल राज ठाकरे म्हणाले, "मोबाईलवर दिसणाऱ्या गोष्टी आपण पाहतो. ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणाऱ्या फिल्मना सेंसॉरशीप कुठे आहे? हा विचार केला पाहिजे. साखर कारखान्यांना अनेक कोटीचे अनुदान मिळत. नाट्य संस्थांना देण्यास काय हरकत आहे? सरकारकडून नाट्य क्षेत्राला प्रोत्साहन मिळालं पाहिजे." दरम्यान, 'नाटक आणि मी' ही मुलाखत रंजकदार झाली. दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांच्याशी सुसंवाद साधला.

शतकी संमेलन हे केशराने भरलेले उद्यान - देवेंद्र फडणीस

"मराठी रंगभूमी आणि नाट्यसृष्टी टिकवण्यास रंगकर्मी यांनी मोठा भार उचललाय. मुकपट आले, बोलपट आला, दूरदर्शन आले, ओटीटी आला तरी नाटक हे संपले नाही. जोपर्यंत मराठी प्रेक्षक आहे, तो पर्यंत नाटक संपणार नाही. कला आणि साहित्याचा विकास होणं गरजेचं आहे. शासन चळवळीच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहिलं" अशी ग्वाही महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली. ते १००वाव्या नाट्य संमेलनात बोलत होते. सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, आयोजक भाऊसाहेब भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शाखेने महाराष्ट्रातील जेष्ठ २५ रंगकर्मींचा उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in