शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!

दक्षिण मुंबई या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने भायखळा विधानसभा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!
Published on

- मंदार पारकर

कल मतदारसंघाचा

दक्षिण मुंबई या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने भायखळा विधानसभा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते येथून सलग दोन वेळा खासदार बनलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचे. या मतदारसंघातही दोन शिवसैनिकांमध्येच लढत होणार आहे. मुंबईतील या मतदारसंघातील लढतीवर जास्त लक्ष असणार आहे. कारण शिवसेना कोणाची या तांत्रिक बाबीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी रस्त्यावरच्या लढाईत शिवसेना कोणाची यावर ज्या मतदारसंघात जनता शिक्कामोर्तब करणार आहे त्यात हा मतदारसंघ आघाडीवर असणार आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघात टोकाचा विरोधाभास दिसून येतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यातही मुंबईचे आर्थिक नाक अगदी शतकांपासून याच विभागात येते. मंत्रालय, विधान भवनपासून ते सर्व प्रमुख उद्योग, कंपन्यांची मुख्यालये याच भागात आहेत. देशातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपती देखील याच विभागात राहतात. तर परळ-लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, लोअर परेलसारखा गिरणगावचा परिसरही याच मतदारसंघात येतो. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ, अजय चौधरी यांचा शिवडी, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा भायखळा, भाजपचे मंगलप्रभात लोढा यांचा मलबार हिल, काँग्रेसचे अमिन पटेल यांचा मुंबादेवी आणि भाजपच्याच राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

सध्या मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जात राज्यसभेचे सदस्यत्व पटकाविले आहे. या मतदारसंघात आधी भाजपची चर्चा होती. विधानसभाध्यक्ष तसेच कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर आणि मलबार हिल मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत होती. दोघांनीही मतदारसंघात प्रचारही सुरू केला होता. मात्र तसे झाले असते तर मुख्यमंत्री शिंदेंवर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ गमावला अशी जोरदार टीका झाली असती. मुख्यमंत्री शिंदेंनी जोर लावत हा मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतला. नंतर अर्थातच यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.

हा मतदारसंघ संमिश्र असला तरी या मतदारसंघात ४५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान मराठी मते आहेत. स्वत: आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतो. आदित्य ठाकरेंसोबत अजय चौधरी देखील ठाकरे गटात आहेत. काँग्रेसचे अमिन पटेलही मुंबादेवीतून आमदार आहेत.  पण स्वत: यामिनी जाधव यांचा भायखळा, कुलाबा, मलबार हिल हे महायुतीकडे आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघांची ताकद समसमान आहे. यात मनसे फॅक्टर देखील महत्वाचा ठरणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आधी आमदार राहिलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहेच, पण बाळा नांदगावकर यांचे व्यक्तिगत संबंध मतदारांशी तर आहेतच पण शिवसेना आणि इतर पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मनसेची मते यामिनी जाधव यांच्यासाठी फार मोठी जमेची बाजू ठरणार आहेत. सोबतच यामिनी जाधव यांचा मतदारसंघातील दलित, मुस्लिम मतांवरही चांगला होल्ड आहे. महाविकास आघाडीकडे त्यामुळे ही मते एकगठ्ठा पडणार नाहीत. या मतदारसंघात गुजराती-मारवाडी समाजाची लोकसंख्याही दखल घेण्याजोगी आहे. ही मते कोणाच्या पारड्यात जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदारसंघाचा इतिहास

काँग्रेसच्या स. का. पाटील यांनी १९५२ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात विजय मिळविला होता. सलग तीनवेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९६७ साली संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जॉर्ज फर्नांडिस यांनी स.कांचे राज्य संपविले. नंतरच्या काळात काँग्रेसच्या मुरली देवरा यांनी सलग तीनवेळा नंतर पुन्हा एकदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी देखील दोन वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. सध्याचा इतिहास पाहिला तर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी आपल्या वडिलांचा गड राखला. तर २०१४ आणि मागच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in