
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृत्थीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे. आशिष देशमुख हे वारंवार पक्षवरोधी वक्तव्य करत होते. त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केली होती. ती वक्तव्य देशमुख यांना भोवल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणाची कारवाई करताना पृत्थीराज चव्हाण म्हणाले की, "महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला आपण 9 एप्रिल 2023 रोजी उत्तर दिले आहे. त्यावर चर्चा केली आहे. आपण आपले पक्षाविरोधी वर्तन आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेली उत्तरे समितीला समाधानकारक वाटत नसल्याने आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणी लागू होतात. त्यामुळे आपण केलेल्या पक्षाविरोधी वक्तव्यांची दखल घेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची शिस्तपालन समितीने आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षासाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. " असे चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.