अशोक चव्हाण आमचेच नेते; काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत नेत्यांचा सूर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अशोक चव्हाण आमचेच नेते; काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत नेत्यांचा सूर
Published on

प्रतिनिधी/नांदेड : काँग्रेसचे पक्ष निरीक्षक शेख युसुफ यांनी गुरुवारी नांदेडमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पक्ष वेगळा असला, तरी अशोक चव्हाण हेच आमचे नेते असल्याचा सूर अनेकांच्या मनोगतातून उमटला. तसेच आगामी लोकसभेचा खासदार काँग्रेसचाच होणार, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे नांदेडमधील काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्ष निरीक्षक शेख युसुफ गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहर व ग्रामीणचे जिल्हा काँग्रेसचे समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या उपस्थितीत नवीन मोंढा येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण आम्ही हतबल न होता पूर्ण ताकदीनिशी लढवून आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेडचा खासदार हा काँग्रेस पक्षाचा करणार, असा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असून, यापुढे जिल्हाध्यक्ष सांगतील त्यांचेच आदेश बाळगू असे सांगितले, तर माजी आमदार भोसीकर म्हणाले, शंकरराव चव्हाण यांनी सांगितलेल्या तत्त्वासाठी लढायचे आहे. दु:ख करून चालणार नाही. अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी परिस्थिती निर्माण करा. लवकर पुढील आठवड्यात काँग्रेस पक्षाचा नांदेडला मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षांना देणार अहवाल

ईडी, सीबीआयच्या धमक्या देऊन आमचे नेते नेत आहेत. काँग्रेससाठी काम करा, काँग्रेसला जिवंत ठेवा. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देणार आहे, असे पक्ष निरीक्षक शेख युसुफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in