अशोक चव्हाण डरपोक! मैदान सोडून विरोधकांशी हातमिळवणी -रमेश चेन्नीथला

काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली
अशोक चव्हाण डरपोक! मैदान सोडून विरोधकांशी हातमिळवणी -रमेश चेन्नीथला

प्रतिनिधी/मुंबई : अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दोनवेळा मुख्यमंत्रीपद, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत काँग्रेस पक्षात असलेले अशोक चव्हाण अचानक भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण हे डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपमध्ये गेले, भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून ते स्वच्छ झाले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का? असा टोलाही चेन्नीथला यांनी लगावला.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, “अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह जोमाने लढा देत राहील. अशोक चव्हाण दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे व इतर वरिष्ठ नेत्यांना भेटले, परवा बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली, तरीही त्यांनी पक्ष सोडला. काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांच्यावर काय अन्याय केला? की ईडी, सीबीआयला घाबरून ते गेले, याचे उत्तर जनतेला द्यावे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याने काँग्रेस पक्ष कमजोर होणार नाही. पक्ष विचारधारेनुसार काम करत असतो, पार्टी सोडणाऱ्यांना जनता स्वीकारत नाही. काँग्रेस पक्ष आणखी जोमाने काम करेल व लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपमध्ये गेले, भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुवून ते स्वच्छ झाले. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळाचा आरोप पंतप्रधान मोदींनीच केला होता, त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का? महाराष्ट्र विकास आघाडी मजबूत आहे, त्याला कमजोर करण्यासाठी भाजप धडपड करत आहे, असे ते म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला सुरू होता. अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली.”

चव्हाणांनी फेरविचार करावा - नाना पटोले

काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली, पण भाजपमध्ये त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. भाजप अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही, हे त्यांच्याच सर्व्हेत दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in