ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

"भाजपची कुंडलीतील रास वृश्चिक असून काँग्रेसच्या कुंडलीतील रास मेष आहे. दोन्ही राशींचे खाली मंगळ आहे. सत्तेसाठी लागणारे राजकारणी राहू दोनही कुंडलीत पराक्रम स्थानात आहे व केतू ग्रह भाग्य स्थानात...
राहुल गांधी नरेंद्र मोदी
राहुल गांधी नरेंद्र मोदीप्रातिनिधिक फोटो

मुंबई: सध्या देशात लोकसभा निवडणूकांचं वारं वाहतंय. लोकशाहीची जत्राच सुरु आहे म्हणा की...भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, शिवसेना....सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनं लढतायत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सपासून ते गावाकडच्या पारापर्यंत सगळीकडंच कसा माहौल तयार झालाय. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पायात भिंगरीच बांधलीय जणू. कोण म्हणतंय देशात पुन्हा मोदीच येणार, तेही ४०० पार करून...तर कुणी म्हणतंय यावेळी यंदा ओन्ली रागा....राहुल गांधी मोदींच्या नाकावर टिच्चून येणार... सोशल मीडियावर तर नुसता धुरळाच चाललाय. एखादी पोस्ट पडतीये ना पडतीये तोच लोक तुटूनच पडतायत. प्रत्येक पोस्टवर कमेंटचा नुसता पाऊसच..

मतदारराजा नेमका कुणाच्या बाजूनं उभं राहणार याचा अंदाज बांधणं तसं मुश्किल झालंय. जुने जानते पुढारी, त्यांचे कट्टर कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, पत्रकार, कैक उन्हाळे-पावसाळे खाऊन केस पांढरे झालेली म्हातारी-कोतारी, चॅनेलवाल्यांचे पेड-अनपेड ओपिनियन पोल सगळेच आपापल्या पद्धतीनं अंदाज लावतायत. पण या सगळ्या लफड्यात मतदारराजा मात्र गोंधळून गेलाय. आता हे काय कमी होतं, म्हणून आता ज्योतिषीपण यात उतरलेत.

ज्योतिषांनी काय भाकित केलंय..

नंदकुमार पाठक असं या ज्योतिषाचं नावय...त्यांनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची प्रॉपर कुंडलीच काढलीये आणि निकाल कुणाच्या बाजूनं लागणार हेच डायरेक्ट सांगून टाकलंय. विषयच क्लोज करून टाकलाय म्हणा की....

ते म्हणतायत, "येणाऱ्या लोकसभा निवडणूका व त्यांचे निकाल याबाबतीत सर्व देश व जगाचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये प्रामुख्यानं भाजप व काँग्रेस हे दोन पक्ष रणसंग्रामात उतरलेले आहेत. वर दिलेल्या दोनही पक्षांचे कुडलीनुसार निकाल कसा लागेल हे बघूया.

भाजपची कुंडलीतील रास वृश्चिक असून काँग्रेसच्या कुंडलीतील रास मेष आहे. दोन्ही राशींचे खाली मंगळ आहे. सत्तेसाठी लागणारे राजकारणी राहू दोनही कुंडलीत पराक्रम स्थानात आहे व केतू ग्रह भाग्य स्थानात आहे. भाजपच्या वृश्चिक राशीप्रमाणे मंगळ ग्रह मे महिन्यात पाचवे स्थानवर आहे. मे महिन्यात सर्व राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. हा कालखंड भाजपला खूप अनुकूल आहे. पूर्व-उत्तर दिशेकडे भाजपला सीट्स चांगल्या मिळतील. अटीतटीचा सामना होऊन विजय मिळेल. काँग्रेसच्या मेष राशीप्रमाणे पश्चिम दिशेकडे व दक्षिण दिशकडील काही भागात मताधिक्य वाढून सीट्स चांगल्या वाढतील.

शनी ग्रहाचे भ्रमण भाजपसाठी चतुर्थ स्थानात म्हणजे सुख स्थानात असल्यानं बहुमत मिळेल. भाजप पक्षास ३९६ ते ३९८ जागा मिळतील. काँग्रेस व इतर घटक पक्षास १३२ व अपक्षास १२ ते १५ अशा जागा मिळतील, असे दिसते. येत्या काही १०-१५ वर्षापर्यत भाजप पक्षास बहुमत व सत्ता मिळून भारताचा कारभार चालेल असे दिसते."

नेटकऱ्यांना हवाय ज्योतिष बुवांचा पत्ता-

नंदकुमार पाठक यांनी कुंडली चेक करून या निवडणूकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आणि नेमकं कुणाचं सरकार बनणार हेपण सांगितलंय.

आता त्यांनी काढलेली ही कुंडली सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये. नेहमीप्रमाणे सोशल मीडिया फायटर एक्टिव्ह मोडमध्ये आलेत. कमेंट वॉर सुरु झालंय. एका एक्स (पूर्वीचं ट्वीटर) युजरनं ज्योतिषबुवांचा पत्ताच मागितलाय. त्याला ड्रीम ११ वर टीम लावायचीये. दुसरा म्हणतोय, यांचा पत्ता द्या. लग्नाबद्दल विचारायचं होते. एका युजरला ज्योतिषबुवांच्या भाकितात थोडी गडबड वाटली. तो कमेंटमध्ये म्हणतोय तुम्ही भविष्य बरोबर वर्तवलंय, फक्त तिकडचं इकडं आणि इकडचं तिकडं केलंय. तर आणखी एकजण म्हणतोय, ज्योतिषी पण म्हणतोय ४०० पार येणार नाहीत. इकडे भाजप-काँग्रेस फाईटमध्ये एका युजरला मनसेची आठवण आलीये. तो म्हणतोय मनसेची कुंडली पण दाखवा. जीवनरेखा आहे का संपली बघा म्हणावं.

logo
marathi.freepressjournal.in