पक्षाच्या तुकड्यांना समाजवादी ठिगळ लावण्याचा प्रयत्न ; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आपल्या विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचे जिवंत उदाहरण उद्धव ठाकरे आहेत, असं देखील शेलार म्हणाले
पक्षाच्या तुकड्यांना समाजवादी ठिगळ लावण्याचा प्रयत्न ; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या समाजवादी जनता परिवारासोबत होणाऱ्या युतीवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा गर्व से कहो हम हिंदू है होती. आता उद्धव ठाकरे यांनी गर्व से कहो हम समाजवादी है, अशी केली आहे. आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचल्यावर गर्व से कहो हम एमआयएम है, असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

पन्नास ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. आपल्या पक्षात तुकडे पडले आहेत आणि त्याला समाजवादाची ठिगळ लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचे जिवंत उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जाज्वल्य हिंदुत्व मांडलं, त्यांच्या सुपुत्राने काय करून दाखवले. त्याची यादी मोठी आहे. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन म्हटलं आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी बसले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. बाळासाहेब यांच्या सुपुत्राने अहमद पटेलसमोर कुर्निसात घालणारे चित्र दाखवलं. राम मंदिरावर प्रश्न निर्माण करून राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टा केली. विशिष्ट वर्गाच्या मतासाठी लांगूलचालनाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. हे सर्व हिंदुस्थान आणि महाराष्ट्र पाहत असल्याचे शेलार म्हणाले.

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सत्काराबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागताशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. बीसीसीआयचाही संबंध नाही हा आयसीसीचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांना विस्मृती झाली असेल त्यांना आठवण करून देतो, आम्हाला प्रश्न विचारायची हिंमत त्याने करावी जो स्वच्छ आहे. उद्धव ठाकरे तुमच्या घरात दाऊदचा जावई असलेला पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियाँदाद यांना तुम्ही बिर्याणी खायला घातली. तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचारू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना भारतावर हल्ला करणाऱ्यांना साथ देणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवण्याचे काम केले. त्यांनी आता आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in