बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडला; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता

भाजपने सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे जे राजकारण सुरू केले आहे त्याचे बाबा सिद्दीकी हे बळी आहेत
बाबा सिद्दीकींनी काँग्रेसचा हात सोडला; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता

प्रतिनिधी/मुंबई : उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे सिद्दीकी यांनी गुरुवारी एक्सवरून जाहीर केले. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील अल्पसंख्यांक समाजात प्राबल्य असणारे नेते समजले जातात. सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मी लहान वयातच काँग्रेसशी जोडला गेलो. गेल्या ४८ वर्षांपासून मी पक्षात होतो. माझा हा प्रवास मी थांबवतो आहे. कारण आज मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांचे पुत्र झिशान हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे तेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

येत्या १० तारखेला एका छोट्या सभेत मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. मी आता निर्णय घेतला आहे. मला कुणी थांबवण्याचे प्रयत्न केले ते मी सांगणार नाही. मी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतरही काही गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवले की, आपण लांब गेलेले बरे, असे सिद्दीकी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक समाजाला घेऊन जाण्याचे काम आजच्या घडीला अजित पवार करत आहेत. असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले.

सिद्दीकी सरकारी यंत्रणांच्या दबावाचे बळी : वर्षा गायकवाड

भाजपने सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे जे राजकारण सुरू केले आहे त्याचे बाबा सिद्दीकी हे बळी आहेत, मात्र देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना भाजपच्याच गोतावळ्यात बाबा सिद्दीकी सामिल होत आहेत हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सिद्दीकी ज्या अजित पवार यांच्या पक्षात जात आहेत, तो पक्ष भाजपच्या हातातील बाहुला आहे. त्यामुळे सरतेशेवटी ते एका धर्मांध पक्षात सामील होऊन अल्पसंख्याक समाजाशी प्रतारणा करत आहेत, असेही गायकवाड म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in