बाळासाहेबांच्या जन्मदिनी प्रचाराचे रणशिंग, उद्धव अयोध्येऐवजी नाशिकला!

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नाशकात ठाकरे गटाची जाहीर सभा होणार!
बाळासाहेबांच्या जन्मदिनी प्रचाराचे रणशिंग, उद्धव अयोध्येऐवजी नाशिकला!

राजा माने/ मुंबई

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली असून, सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. त्यात ठाकरे गटही पुढे सरसावला असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांनीही नाशिकमधूनच निवडणूक रणशिंग फुंकणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये सभा घेऊन लोकसभेच्या प्रचाराचा रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी रोजी जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या निमित्ताने नाशिकमध्ये ठाकरे गटाने जाहीर सभा घेण्याचे ठरविले आहे.

तत्पूर्वी, उद्धव ठाकरे २२ जानेवारी रोजी नाशिकमधील काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गोदावरी नदी तीरावर आरती केली जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी दार उघड बये दार उघड अशी जगदंबेची आराधना केली जाणार असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले. अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आता अयोध्येतील मंदिर अर्धवट आहे. मंदिराचे पूर्ण बांधकाम झालेले नाही, तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकार्पण केले जात आहे. हिंदू धर्मात पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केले जात आहे, असा आरोप करीत खा. विनायक राऊत यांनी राम दैवत आहे. रामाची पूजा करताना राजकारण नको, असे म्हटले.

फडणवीस संधीसाधू : राऊत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वार्थी आणि संधीसाधू आहेत, असा आरोप करतानाच खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वार्थासाठी कोणाचीही चाटुगिरी करू शकतात. खा. राऊत यांच्या टीकेमुळे आता शाब्दिक चकमकी झडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in