अजित पवारांच्या ९० जागा लढवण्याच्या वक्तव्यावर बावनकुळेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले...

हे बहुमताचं मजबुत सरकार असून टिकेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे
अजित पवारांच्या ९० जागा लढवण्याच्या वक्तव्यावर बावनकुळेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यानी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी मुंबई जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या एकूण ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी झालेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीला संबोधित करताना आगामी विधानसभा निवडणूकीत ९० जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ही ७१ च्या वर न्यायची, असा निर्धार अजित पवार यांनी केला. यावरुन शिंदे गटात धुसुफुस सुरु झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवारांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्र तसंच देशाच्या हिताची आहे. अजित दादा यांनी सत्य परिस्थिती मांडली. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या ९० जागांविषयी देखील वक्तव्य केलंय. जागांबद्दल काय बोलण झालं, काय नाही हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. याविषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत निवडणूका लागत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. निवडणुका लागल्यावरच खरं चित्र स्पष्ट होते, त्यामुळे राष्ट्रवादी ९० जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर दौऱ्यावर असताना त्यांचा दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईला परत आले. यावर देखील बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. शिंदे यांची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे ते राष्ट्रपतींचं स्वागत करुन निघाले. मुख्यमंत्र्यांसमोर अनेक विषय असतात. आमच्यात कुठलीही धुसफुस नसून तीन भाऊ असल्याने कमी-जास्त होऊ शकते. पण मनभेद, मतभेद आमच्यात नाहीत. असं म्हणत हे बहुमताचं मजबुत सरकार असून टिकेल असं बावनकुळे यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in