कॅसिनोतील व्हायरल फोटोवर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "...तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ"

भारतात परतल्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कॅसिनोतील व्हायरल फोटोवर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "...तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ"
Published on: 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पर्यटनावर असताना त्यांचा कॅसिनोतील एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला होता. महाराष्ट्र जळत असताना राज्यातील नेता मकाऊमध्ये असल्याची एक्स पोस्ट राऊत यांनी केली होती. यात त्यांनी बावनकुळे यांनी जुगारात साडेतीन कोटी उडवल्याचा आरोप देखील केला होता. या पोस्टवरुन राज्यात प्रचंड राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारतात परतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

ते म्हणाले की, गेल्या ३४ वर्षापासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केलं. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत. आम्ही चार वेळा निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. आम्ही ३४ वर्षे काम करुन इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांच्या प्रयत्न त्यांना लखलाभ

पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आमि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँगकांग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करत असताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं, असं देखील बावनकुळे म्हणाले.

सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर कॅसिनो क्रॉस करावं लागतं. मकाऊ किंवा हॉंगकाँगला गेल्यावर कॅसिनो क्रॉस करुनच सगळीकडे जावं लागतं. कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि साडेतीन कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन तीव वेळा चेकिंक करावी लागते, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं.

logo
marathi.freepressjournal.in