भाजप आणि शिवसेनेत सध्या काहीही अलबेल नसल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरु आहेत. शिवसेनेकडून १३ जून रोजी केलेली जाहिरात असो वा भाजपकडून कल्याण डोंबीवली मतदारसंघावर सांगण्यात आलेला दावा, या गोष्टी या वादाला कारणीभूत आहेत. आता दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवार सुरु झाला आहे. दोन्ही पक्षांकडून पोस्टर लावून एकमेकांवर तोंडसुख घेतलं जात आहे. यावर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोस्टर लावू नका अशी तंबीच दिली आहे.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाही तर महाराष्ट्र विकासात क्रमांक एकवर रहावा आणि हिंदुत्वाचा विचार वाढावा यासाठी एकत्र आलो आहोत. फोटो, जाहिरात, बॅनर याला काही अर्थ नाही. अतिउत्साहात कार्यकर्ते काही गोष्टी करतात. काहीही झालं तरी भाजपा-शिवसेना युती राहणार, कुणीही बोलू नये, बॅनर लावू नये, अशा सुचना अध्यक्ष म्हणून मी आमच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बावनकुळे यांनी सेना- भाजप युतीतील जागावाटपबाबत आमच्या पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. बाकीच्या फक्त तोंडाच्या वाफा आहे. असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर येथे वेगवेगळ्या कारमधून गेले. याविषयी बोलताना त्यांनी या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. तसंच गृहखात्याला बदनाम करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलं.