
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाला बसल्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशात राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मंनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. हिंगोलीत असताना त्यांनी भुजबळांनी विचारांत बदल करावा, असं विधान केलं होते. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जरांगे यांना प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास मी विरोध केला नाही. मराठा समाजाला निश्चित आरक्षण द्या. फडणवीसांनी यासंबंधचं विधेयक समोर आमलं होते. त्याला मी देखील पाठिंबा दिला. प्रश्न असा आहे की, ओबीसीचं आरक्षण फार कमी आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. ओबीसींमध्ये पाऊणे चारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक राहीलं आहे. त्यामुळे मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. त्यासाठी असलेली अडचण धूर करा असं माझं मत आहे. असं भुजबळ म्हणाले.
याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, हे माझ्या एकट्याचं मत नाही. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये. हे मुख्यमंत्र्यांचं देखील मत आहे. तसंच उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचं देखील हेच मत आहे. मग मलाच एकट्याला का बोलता? माझ्या एकट्याच्या हातात काय आहे. ही सगळी मंडळी त्याच मताची आहे. मला जरांगेंना हेच सांगायचं आहे.