केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF)च्या कामगिरीचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (दि.१३) कौतुक केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आज (दि. १४) भाजपने तीव्र शब्दांत टीका केली आहे. "राहुल गांधी निवडणूक निकालांवर निवडक पद्धतीने शंका उपस्थित करतात आणि त्यासाठी कोणताही ठोस पुरावा देत नाहीत," असा आरोप भाजपने केला आहे.
ईव्हीएमवर शंका आणि वोट चोरीचे आरोप
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला. निवडणूक निकाल काँग्रेसच्या बाजूने नसेल तर राहुल गांधी ठराविक पद्धतीने ईव्हीएमवर शंका उपस्थित करतात, वोट चोरीचे आरोप करतात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, विजय मिळाल्यावर याच प्रक्रियेवर पूर्ण विश्वास दाखवतात, असा आरोप मालवीय यांनी केला.
“निवडक विश्वासावर लोकशाही चालू शकत नाही. निवडणूक प्रक्रियेतून विजय साजरा करायचा आणि पराभवानंतर त्याच प्रक्रियेची विश्वासार्हता नाकारणे हे लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमकुवत करते," असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न
"कोणताही पुरावा नसताना निकालांवर प्रश्न उपस्थित करणे आणि त्याच प्रक्रियेत वारंवार सहभागी होणे, हे राजकीय प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे," असे मालवीय यांनी म्हटले. "पराभव स्वीकारतानाही सातत्य आणि संस्थांचा आदर राखणे ही लोकशाहीची गरज आहे," असेही त्यांनी नमूद केले.
मालवीय यांची ही प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्या ‘एक्स’वरील पोस्टनंतर आली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत UDF ला मिळालेल्या यशाचे स्वागत केले होते. केरळच्या जनतेने UDF वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले आणि हा कौल निर्णायक व उत्साहवर्धक असल्याचे म्हटले होते.
जबाबदार, ऐकून घेणारे आणि परिणाम देणारे प्रशासन हवे
राहुल गांधी यांनी असेही नमूद केले होते की, "या निकालांमधून UDF विषयी विश्वास वाढतोय असे दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. जबाबदार, ऐकून घेणारे आणि परिणाम देणारे प्रशासन हवे असल्याचा हा संदेश असून, काँग्रेस रोजच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करेल आणि पारदर्शक कारभार देईल, असे सांगत त्यांनी नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधी आणि पक्षकार्यकर्त्यांचे अभिनंदन सोशल मीडियामार्फत केले होते.
लोकशाही प्रक्रियेवरील जनविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न
दरम्यान, निवडणूक यादीतील विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision) आणि कथित मतभेद व मतमोजणीतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून संसदेत वारंवार गोंधळ सुरू आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावत, विरोधी पक्ष लोकशाही प्रक्रियेवरील जनविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. "हा प्रश्न केवळ एका नेत्यापुरता किंवा एका पक्षापुरता मर्यादित नसून, संपूर्ण विरोधकांनी विश्वासार्हता, जबाबदारी आणि लोकशाही संस्थांप्रती आदर याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असे अमित मालवीय यांनी सांगितले.