Modi Cabinet 3.0: महायुतीत असंतोष

महाराष्ट्रात महायुतीत असंतोषाची ठिणगी पडल्याचे सोमवारी दिसून आले. भाजपने महाराष्ट्रातील महायुतीतील मित्रपक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात फारसा वाटा दिला नाही, तसेच महत्त्वाची खाती देण्याचेही टाळले.
Modi Cabinet 3.0: महायुतीत असंतोष
PTI

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीत असंतोषाची ठिणगी पडल्याचे सोमवारी दिसून आले. भाजपने महाराष्ट्रातील महायुतीतील मित्रपक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात फारसा वाटा दिला नाही, तसेच महत्त्वाची खाती देण्याचेही टाळले. त्यामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज झाला असून, श्रीरंग बारणे व छगन भुजबळ या नेत्यांनी आपली नाराजी सोमवारी जाहीर केली.

कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटात नाराजी

केंद्रीय मंत्रिमंडळात योग्य ते स्थान न मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाची नाराजी आता उघड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पक्षाचा एकमेव खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद, चिराग पासवान यांच्या पक्षाचे पाच खासदार निवडून आले त्यांनाही कॅबिनेट, पण आमच्या पक्षाचे ७ खासदार निवडून येऊनही राज्यमंत्रिपद मिळाले. ही भाजपची भूमिका अन्यायकारक आहे, असे मत श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाच्या फक्त प्रतापराव जाधव यांनाच राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. शिवसेनेचे सात खासदार असल्याने त्यांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती, मात्र त्यांना कॅबिनेट मिळाले नाही. त्याबाबत श्रीरंग बारणे यांनी सोमवारी उघड नाराजी व्यक्त केली.

ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्यालाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. एच. डी. कुमारस्वामी यांचे दोन खासदार आहेत, त्यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. चिराग पासवान यांचे पाच खासदार असूनही त्यांना कॅबिनेट मिळाले. मग शिवसेनेचे तर सात खासदार आहेत. भाजपने २८ जागा लढविल्या व ९ जागांवर विजय मिळविला, तर शिवसेनेने १५ जागा लढविल्या व त्यापैकी ७ जागा जिंकल्या. त्यामुळे आम्हाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती, असे बारणे म्हणाले.

मंत्रिपदाच्या वाटपात दुजाभाव - बारणे

शिवसेना हा भाजपचा जुना साथी आहे. चंद्राबाबू यांचे १६, तर नितीशकुमार यांचे १२ खासदार आहेत. त्या खालोखाल मोठा पक्ष म्हणून शिवसेना ७ खासदारांसह रालोआत आहे. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपात दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीत होतोय. आम्हाला न्यायिक वागणूक दिली पाहिजे. लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने योग्य भूमिका घेतली पाहिजे अशी आमची अपेक्षा होती, असेही बारणे म्हणाले.

विधानसभेला शिंदे गटाइतक्याच जागा मिळाव्यात - छगन भुजबळ

राज्यातील सरकारमध्ये भाजप मोठा भाऊ हे मान्य आहे. पण मागे आम्ही सांगितले होते की आमचेही ४०-४५ आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचेही तितकेच आमदार आहेत. त्यामुळे त्यांना जितक्या मिळणार तेवढ्याच जागा आम्हालाही विधानसभा निवडणुकीसाठी मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

आता विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने संविधान बदलाचा मुद्दा चालणार नाही. दलित, ओबीसी, मराठा हे आपले मतदार आपल्याला मिळवावे लागतील, असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मंत्र्यांनी अथवा इतर कुणी जागावाटपावर बोलू नये, असा इशारा आपल्या भाषणात दिला.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापनदिन सोमवारी साजरा झाला. त्यात छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग केली. आधी मी बोललो कमीत कमी ८० जागा मिळाल्या पाहिजेत. तेव्हा मला सांगितले असे बोलायचे नाही. बरे ठिक आहे, पण जागावाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून फायदा होणार नाही. त्याचा लवकर निपटारा केला पाहिजे. भाजप हा मोठा भाऊ हे मान्य आहे. आम्हीसुद्धा सांगितले होते आमचे ४०-४५ आमदार आहेत, शिंदेंचेही तेवढेच आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळणार तेवढ्या आम्हालाही मिळाल्या पाहिजेत. शिंदेंचे जास्त खासदार निवडून आले ते विधानसभेतील जास्त जागा घेतील असे म्हणू नका, असे स्पष्ट करीत छगन भुजबळ यांनी समान जागावाटपाचा मुद्दा पुढे रेटला.

जागावाटपावर कुणीही बोलू नका - तटकरे

मात्र, मंत्र्यांनी अथवा इतर कुणी जागावाटपावर बोलू नये, असा इशारा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी भाषणात दिला. आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत काय होईल, अशी चर्चा आहे. पण जागावाटपावर मंत्र्यांनी आणि इतर कुणी काही बोलू नका, तुम्ही बोललात की मित्रपक्षाचे प्रवक्ते बोलतात आणि मग महायुतीत वातावरण कलुषित होते. महायुतीत आपल्याला समन्वय ठेवायचा आहे, गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आज आपल्याकडे ५३ आमदार आहेत आणि इतर काही मिळून ५७ च्या पुढे आकडा जातो. आपल्याला याच्यापुढे जागा मिळणार, किती मिळणार ते मी आताच सांगत नाही, असेही तटकरे यावेळी म्हणाले.

कोणीतरी म्हणते, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात नवे नेतृत्व देणार, कुणी १५ दिवसांची मुदत दिली आहे, तुमच्या मुदतीला कुणी भीक घालत नाही, राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचारांशी जुळला गेला आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे, विधानसभा निकालात घड्याळाचा गजर चांद्यापासून बांद्यापर्यंत ऐकायला मिळेल, असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला.

राज्याच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांक, शेतकरी, ५० टक्के महिला भगिनींसाठी सुशिक्षत बेरोजगारांसाठी काही तरतुदी केल्या जाव्यात. लोकसभा निवडणूक समाजा-समाजात अंतर निर्माण करत लढली गेली. आपल्याला सर्व घटकांना, सर्व समाजाला सोबत घेऊन पुढची गौरवशाली वाटचाल करायची आहे, असे सांगत ‘एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र’, अशी घोषणा तटकरे यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in