ओदिशामध्ये भाजप सरकार, २४ वर्षांनी नवीन पटनायक यांचा बालेकिल्ला ढासळला; लोकसभेतही भाजपची मुसंडी

गेले २४ वर्षे सत्तेत असलेले बिजदच्या नवीन पटनायक सरकारचा ओदिशा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. ओदिशात भाजपने मुसंडी मारली असून बहुमत मिळवले आहे.
 Naveen Patnaik stronghold collapses after 24 years
X

भुवनेश्वर : २००० पासून सलग २४ वर्षे ओदिशावर राज्य करणाऱ्या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाची सत्ता मंगळवारी संपुष्टात आली. पटनायक यांच्या खुर्चीला सुरुंग लावत भाजपने या राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. १४७ विधानसभा असलेल्या ओदिशा विधानसभेत भाजपने ८० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत आलेल्या कलानुसार, बीजू जनता दलाचे उमेदवार ५०, काँग्रेसचे १५, माकपचे एक तर अपक्ष उमेदवार एका जागेवर पुढे होता. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कांटाबांजी व हिंजिली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तर नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री पिछाडीवर आहेत. वन व पर्यावरण मंत्री प्रदीप कुमार अमात, सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रफुल्ल कुमार मल्लिक, उच्च शिक्षण मंत्री अतनु सब्यसाची नायक, परिवहन मंत्री तुकुनी साहू, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अशोक चंद्र पांडा, अर्थमंत्री बिक्रम केशरी अरुखा, वस्त्रोद्योग मंत्री रीता साहू व महिला व बाल विकास मंत्री बसंती हेम्ब्रम हे पिछाडीवर आहेत.

भाजपने ओदिशा विधानसभेत पहिल्यांदाच दणदणीत विजय मिळवून पुनरागमन केले. भाजपला या निवडणुकीत ४०.५९ टक्के मते तर बीजू जनता दलाला ४०.१६ टक्के मते मिळाली.

१९ जागांवर आघाडी

ओदिशात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. लोकसभेच्या २१ जागांपैकी १९ जागांवर भाजप आघाडीवर आहेत.

केंद्रीय मंत्री व भाजप उमेदवार धर्मेंद्र प्रधान हे संभलपूर लोकसभा मतदारसंघातून १,१२, ९८४ मतांनी आघाडीवर आहेत. तर पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा हे ९३,५५५ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारी अपराजित सारंगी या ३२,२८२ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उपाध्यक्ष बैजयंत पांडा हे केंद्रपाडा मतदारसंघातून २३,५०७ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार बेहरामपूर, अस्का, पुरी, जगजतसिंगपूर, कटक, धेनकनाल, केंद्रपाडा, भद्रक, बालासोर, मयूरभंज, केंजोअर, सुरेंद्रगड, बारगड, कालीहंडी आदी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. जाजपूर येथून बिजदच्या खासदार शर्मिष्ठा सेठी आघाडीवर आहेत. कोरापूट मतदारसंघात सप्तगिरी उलका या आघाडीवर आहे.

सत्ता गेली, पटनायक निवडणूकही हरले

ओदिशाचे मुख्यमंत्री व बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक हे कांताभांजी विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. भाजपचे उमेदवार लक्ष्मण बाग यांनी त्यांचा पराभव केला. गेली २४ वर्षे पटनायक हे ओदिशाचे मुख्यमंत्री होते. तसेच एकही निवडणूक हरलेले नव्हते. मात्र यंदा भाजपच्या लाटेत त्यांनी आपली सत्ता गमावलीच तर त्यांचा पराभवही झाला.

logo
marathi.freepressjournal.in