उन्मेष पाटील ठरले पक्षांतर्गत राजकारणाचा बळी; रक्षा खडसेंना रावेरमध्ये तिसऱ्यांदा संधी, जळगाव मतदारसंघात ‍स्मिता वाघ

महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी अखेर जाहीर झाली. त्यात भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघात रावेरची जागा राखण्यात रक्षा खडसे यांना यश आले आहे.
उन्मेष पाटील ठरले पक्षांतर्गत राजकारणाचा बळी; रक्षा खडसेंना रावेरमध्ये तिसऱ्यांदा संधी, जळगाव मतदारसंघात ‍स्मिता वाघ
Published on

विजय पाठक / जळगाव

महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी अखेर जाहीर झाली. त्यात भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघात रावेरची जागा राखण्यात रक्षा खडसे यांना यश आले आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दर्शवत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उच्चशिक्षित व आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे खासदार उन्मेष पाटील हे जिल्ह्यातील पक्षीय गटबाजीचे राजकारण कुरघोडी करण्याची वृत्ती याचा बळी ठरून त्यांचे तिकीट कापले गेले आणि तेथे स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. या बदलाचा फटका कदाचित भाजपला बसू शकतो, अशी चर्चा जाणकार करीत आहेत.

खान्देशात धुळे, नंदुरबार आणि रावेर, जळगाव येथील भाजपचे उमेदवार बदलले जाणार अशी हवा होती, मात्र त्याचा परिणाम पक्षाला जागा गमाविण्यात होऊ शकतो याचा वेळीच अंदाज आल्याने नंदुरबारला डॉ. हिना गावीत, तर धुळ्याला डॉ. सुभाष भामरे यांना परत उमेदवारी देण्यात आली. रावेरच्या जागेसाठी अनेकजण इच्छुक होते. सलग दोन वेळा मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करत आपला कामाचा ठसा उमटवला असतानाच रक्षा खडसे या केवळ एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असल्याने त्यांना बदलण्यासाठी भाजपमध्ये एक गट कार्यरत होता. रक्षा खडसेंना तिकीट मिळू नये यासाठी जिल्ह्यातून भाजपमधून प्रयत्न देखील झाले, पण थेट दिल्लीहून पाठिंबा रक्षाताईंना मिळाल्याने त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली. उमेदवारी जाहीर होताच रक्षा खडसे यांनी संधी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उच्चशिक्षित, कामाचा झपाटा आणि संसदेतील उत्तम कामगिरीची नोंद करणारे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना पक्षीय विरोध नडला. पक्षातील गटबाजी, नेत्यांमधील आपापसातील हेवेदावे यामुळे त्यांना बदलण्याची मागणी लावून धरली गेली. केंद्रीय पसंती, प्रदेश भाजपमधील कोअर टीमची पसंती उन्मेष पाटील यांच्या बाजूने असली, तरी अखेर जिल्हा नेतृत्व बदलाच्या मागणीपुढे राज्य नेतृत्व झुकलेले दिसले. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली.

आपण नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे वारकरी असून पक्षासोबत आहोत व कायम राहू, असे तिकीट नाकारले गेल्यानंतर उन्मेष पाटील यांनी सांगितले. असे असले तरी आता ही जागा भाजपसाठी सोपी राहिलेली नाही. उमेदवार बदलण्याचा फटका भाजपला बसू शकतो.

रावेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सासरे विरुद्ध सून अशी लढत होणार काय, अशी चर्चा राज्यभर सुरू झााली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव खडसे ही निवडणूक लढवणार नसून राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. आज तरी राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. २०१४ मध्ये रावेरमध्ये राष्ट्रवादीने मनीष जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी विक्रमी मतांनी रक्षा खडसे प्रथमच विजयी झाल्या होत्या. याच मतदारसंघात काँग्रेसने नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला होता, पण यश आले नव्हते. आता राष्ट्रवादीकडे उमेदवार नसेल तर ही जागा आपणास द्यावी अशी मागणी जिल्ह्यात अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या काँग्रेसने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in